राज्यातील ७० टक्के शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:29 AM2020-12-15T04:29:09+5:302020-12-15T04:29:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनानंतर सुरू झालेल्या राज्यातील शाळांमध्ये येऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनानंतर सुरू झालेल्या राज्यातील शाळांमध्ये येऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सुमारे सहा लाखांहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्षात वर्गात बसून ज्ञानार्जन करत आहे. राज्यातील ७० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील शाळांमध्ये सर्वाधिक १ लाख १३ हजार ४५५ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असून त्या खालोखाल कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्याचा क्रमांक आहे. तर पुणे जिल्ह्यात ४८ हजार ४५३ विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात येऊन शिक्षण घेत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील सर्व शाळा सुमारे आठ महिने बंद ठेवल्या. मात्र, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेल्या भागात शाळा सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात राज्यातील अनेक शाळा सुरू झाल्या आहेत.
प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार २३ डिसेंबर रोजी राज्यातील ९ हजार १२७ शाळांमध्ये २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थी कोरोनानंतर शाळेत दाखल झाले. तर २ डिसेंबर रोजी ११ हजार ३२२ शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४ लाख ९१ हजार ९६२ एवढी होती.