दोन लाखांच्या गाडीला ७० हजार भाडे!, कॅन्टोन्मेंटमधील प्रकार; माहिती अधिकारातून बाब उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:31 PM2017-10-14T16:31:09+5:302017-10-14T17:26:13+5:30
कॅन्टोन्मेंट भागातील ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी पुणे छावणी परिषद एका गाडीमागे तब्बल ६९ हजार ५८७ रुपयांचे भाडे अदा करीत आहे. एका गाडीचे बाजारमूल्य हे पावणेतीन लाख रुपयांच्या घरात आहे.
पुणे : कॅन्टोन्मेंट भागातील ओला-सुका कचरा गोळा करण्यासाठी पुणे छावणी परिषद (पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड) एका गाडीमागे तब्बल ६९ हजार ५८७ रुपयांचे भाडे अदा करीत आहे. अशा पंधरा गाड्यांपोटी दरमहा १० लाख ४३ हजार ८०५ रुपये कंत्राटदाराला देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे एका गाडीचे बाजारमूल्य हे पावणेतीन लाख रुपयांच्या घरात आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने छावणी परिसरातील घरातून कचरा गोळा करण्यासाठी १५ गाड्या भाड्याने घेतल्या आहेत. संबंधित कंत्राटदाराबरोबर २०११ ते २०१७ असा करार करण्यात आला आहे. या गाडीवर वाहकाची नेमणूक करताना चारित्र्य पडताळणी दाखला आवश्यक असतो. तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडून गाडी सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र देखील संबंधिताला घ्यावे लागले.
एका कचरागाडीला भाड्यापोटी तिच्या किंमतीच्या तब्बल ३५ टक्के रक्कम कॅन्टोन्मेंट बोर्ड अदा करीत आहे. असे असतानाही संबंधित ठेकेदार सेवा करारनाम्याप्रमाणे पुरवितो की नाही, याची तपासणी करण्याचे भान देखील दाखविले नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
माहिती अधिकारात घंडागाडीवर असणार्या चालकाचा चारित्र्य पडताळणी दाखला आणि वाहन परवान्याची प्रत मागितली असता, ती घेण्यासाठी ठेकेदाराकडे संपर्क साधावा असे भयंकर उत्तर यात देण्यात आले आहे. आपटीओ पासिंगबाबतही तसेच उत्तर देण्यात आले आहे. पुणे छावणी परिषदेचे मुख्य आरोग्य निरीक्षक एस. डी. झेंडे यांनी ही माहिती दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय कवडे यांनी माहिती अधिकारात ही बाब उघड केली आहे.
कवडे म्हणाले, २ लाख रुपये किंमतीच्या गाडीसाठी जवळपास ७० हजार रुपये दरमहा भाडे देण्यात येत आहे. ही बाब विसंगत आहे. जी गाडी रस्त्यावरुन धावणार आहे, ती चालविण्यास योग्य आहे, की नाही याची देखील माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे नाही. या सर्व प्रकारात संबंधित ठेकेदाराने कराराचा भंग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा करार रद्द करण्यात यावा.