बेवारस ७०० वाहने १५ दिवसांत जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:17 AM2018-02-06T01:17:58+5:302018-02-06T01:18:03+5:30
शहरात विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बंद पडलेली तब्बल ७०० बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंधरा दिवसांत जप्त केली आहेत.
पुणे : शहरात विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बंद पडलेली तब्बल ७०० बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पंधरा दिवसांत जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक ३७१ दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. त्यानंतर लिलाव करून सर्व वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुनी तब्बल एक लाखांपेक्षा अधिक दुचाकी व चारचाकी वाहने सध्या शहरामध्ये आहेत. आरटीओच्या नियमानुसार संबंधित वाहनमालकांनी सर्व वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. परंतु, ते स्क्रॅप न करता शहरातील सार्वजनिक जागांमध्ये, घराबाहेर रस्त्यांवर वाहने सोडण्यात आली आहेत. यामध्ये अनेक वाहनमालकांकडे वाहन स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने बेवारसपणे सोडण्यात येत असल्याचे समोर आले आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर अभियानातंर्गत या बेवारस वाहनांबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या आहेत. शहरामध्ये हजारो बेवारस वाहने रस्त्यांवर गेली अनेक वर्षे पडून असल्याचे पाहणीमध्ये समोर आले. परंतु पालिका प्रशासनाकडे उचलेली वाहने कुठे टाकायची, असा मोठा प्रश्न प्रशासनासमोर होता. तसेच एवढी वाहने उचलण्यासाठी आवश्यक क्रेन व अन्य यंत्रणादेखील पालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे बºयाच कालावधीपासून सार्वजनिक जागांवर आणि रस्त्यांवर बंद अवस्थेत पडून असलेली ही वाहने वाहतुकीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यातच या वाहनाच्या वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या वाहनामुळे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूककोंडीची वेगळीच समस्या आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरातील बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. परंतु स्वच्छ शहर अभियानामध्ये यामुळे महापालिकेच्या गुणकांवर परिणाम होत असल्याने या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली.
दंड भरून सोडविता येणार आपले वाहन
या कारवाईत जप्त केलेल्या गाड्या घेऊन जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. यामध्ये दोनचाकी गाड्यांसाठी १ हजार रुपये, तीनचाकीसाठी १0 हजार रुपये, चारचाकीसाठी १५ हजार रुपये, सहाचाकीसाठी २0 हजार रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या गाड्यांसाठी २५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला असून, त्यानंतर या गाड्यांचा नियमानुसार लिलाव केला जाईल. ज्यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळू शकणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.
>कारवाईत जप्त केलेली वाहने
शहराच्या विविध भागांत सार्वजनिक ठिकाणी बेवारस पडलेली सुमारे ७०० वाहने प्रशासनाने जप्त केली आहेत. यामध्ये ३७१ दुचाकी गाड्या, ६६ तीनचाकी गाड्या, २५५ चारचाकी आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. या सर्व वाहनांचा एका महिन्यात लिलाव करून स्कॅ्रपमध्ये काढण्यात येणार आहे. तसेच ही मोहीम पुढेदेखील सुरु ठेवण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख माधव जगताप यांनी स्पष्ट केले.