पुण्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी ७ हजार पोलीस तैनात; विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 09:18 PM2021-09-17T21:18:31+5:302021-09-17T21:18:41+5:30
संध्याकाळी सात वाजेपर्यंत मानाच्या गणपतींचे विसर्जन होणार, अमिताभ गुप्ता यांची माहिती
पुणे : गणेश विसर्जनानिमित्त येत्या रविवारी अत्यावश्यक सेवा, तसेच रेस्टॉरंट, हॉटेल वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच पुणे शहरात ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मंडपातच करण्यात येणार आहे. विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी आहे, तर काही ठिकाणी फिरत्या हौदांची सोय असणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवणे, खेळ खेळणे, मिरवणुका काढण्यास यंदाही बंदी आहे, असे अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.
शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी विसर्जनावेळी शहर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे, तसेच नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. मिरवणूक सकाळी १० वाजत सुरू होईल, तर मानाच्या सर्व गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन संध्याकाळी ७ वार्जपर्यंत करण्यात येणार असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
७ हजारांवर पोलिसांचा विसर्जनासाठी असा आहे बंदोबस्त
होमगार्ड- ४५०, एसआरपीएफ- ४ तुकड्या, दंगल विरोधी १० पथके, बॉम्ब शोधक व नाशक ८ पथके, शीघ्र कृती दल १६ पथके, सर्व पोलीस ठाण्यातंर्गत १ हजार १०० कर्मचारी, गुन्हे शाखेतील २०० कर्मचारी, विशेष शाखेतील १०० कर्मचारी, स्ट्रायविंग फोर्स १० पथके, गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेची २० पथके, विशेष पोलीस अधिकारी एसपीओ १ हजार २००