पुण्यात गणेशोत्सवासाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त; स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 09:50 PM2021-09-08T21:50:35+5:302021-09-08T21:51:13+5:30

शहर पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आचारसंहिता तयार केली आहे.

7,000 police personnel for Ganeshotsav | पुण्यात गणेशोत्सवासाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त; स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन

पुण्यात गणेशोत्सवासाठी ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त; स्वयंशिस्त पाळण्याचं आवाहन

Next

पुणे : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर काेरोनाचे सावट आहे. त्यामुळे गणेशोेत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. असे असले तरी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून शहर पोलीस दलाकडून ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

शहर पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आचारसंहिता तयार केली आहे. बंदोबस्तावरील पोलिसांकडून या आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उत्सवासाठी नागरिक बाहेर पडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे यंदा श्रींच्या आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार नाहीत.

गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे ७ हजार पोलिस कर्मचारी, ७०० अधिकारी,शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक,छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियत्रण कक्ष राज्य राखीव पोलिस दलाच्या, तुकड्यांचा समावेश राहणार आहे.

गुन्हे शाखा व विशेष शाखेची पथके

शहरात गणेश उत्सवात गुन्हे घडू नये म्हणून गुन्हे शाखेचा वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक झोननुसार गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये १०० कर्मचारी राहणार आहेत. त्याबरोबरच घातपात विरोधी कारवाईसाठी विशेष शाखेचा ही बंदोबस्त राहणार आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून देखील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीची नजर

पोलिसांकडून बंदोबस्ताच्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात करण्यात आले असले तरी, महत्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर राहणार आहे. गर्दीची ठिकाणे, महत्वाची मंडळी यांची मंदिरे व मंडपात कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ते सर्व चित्रिकरण थेट पोलिस ठाण्यात दिसेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एका कर्मचार्याची नेमणूक केली जाणार असून, उत्सव कालावधीतील चित्रिकरण संग्रहीत ठेवले जाणार आहे.
..........

यंदा देखील उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. शहरातील गणेश मंडळांनी साध्यापद्धतीने उत्सव साजरा करण्यास करण्यास सहमती दर्शविली आहे. मंडळांनी आचरसंहितेचे पालन करून सर्वोतोपरी पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी देखील आपली एक सामाजिक जबाबदारी समजून स्वयंशिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावे.

डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त पुणे

Web Title: 7,000 police personnel for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.