Pune Ganpati: अठराशे ‘सीसीटीव्ही’ बाॅम्ब स्कॉडसह गणेशोत्सवात ७ हजार पोलिसांची गस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 12:57 PM2023-09-17T12:57:53+5:302023-09-17T12:58:43+5:30
पुण्यातील गणेशोत्सवावेळी अन्य शहरांसह परदेशातूनदेखील भाविक शहरात येत असतात
पुणे : गणेशोत्सवाची सध्या सर्वत्र लगबग दिसून येत आहे. शहरातील गणेशोत्सवाला असलेली परंपरा आणि होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनानेही मोठी तयारी केली आहे. शहरात गणेशोत्सवानिमित्त सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कोथरूड येथून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस दल सज्ज झाले आहे.
१९ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होत आहे, त्यानिमित्त मानाच्या गणपती मंडळांसह शेकडो मंडळांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. पुण्यातील गणेशोत्सवावेळी अन्य शहरांसह परदेशातूनदेखील भाविक शहरात येत असतात. पोलिस प्रशासनाने याआधीच सर्व गणेश मंडळांची एक बैठक आयोजित करून, गणेश मंडळांनी काय खबरदारी घेणे गरजेचे आहे, यासंबंधीच्या सूचना त्यांना केल्या आहेत. शहरात एक हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जणार आहे, यासह बॉम्ब स्क्वाडदेखील तैनात केले जाणार असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर राजा यांनी दिली.
असा असेल पोलिस बंदोबस्त...
- पाच हजार पुणे पोलिस मुख्यालयातील अधिकारी- कर्मचारी
- सीआरपीएफच्या पाच तुकड्या
- साध्या वेशातील पोलिसांच्या तुकड्या
- क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी पथक)
- १,३०० पोलिस कर्मचारी बाहेरून
- एक हजार होम गार्ड
- पोलिस मित्र