Pune Ganeshotsav: पुण्यात गणेशोत्सवात ७ हजार पोलीस ठेवणार कडेकोट बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:17 PM2024-09-06T16:17:48+5:302024-09-06T16:18:07+5:30

उत्सवाच्या काळात संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटनांचा धोका विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली

7000 policemen will keep strict security during Ganeshotsav in Pune | Pune Ganeshotsav: पुण्यात गणेशोत्सवात ७ हजार पोलीस ठेवणार कडेकोट बंदोबस्त

Pune Ganeshotsav: पुण्यात गणेशोत्सवात ७ हजार पोलीस ठेवणार कडेकोट बंदोबस्त

पुणे : शहराची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला शनिवारी (दि. ७) प्रारंभ होत आहे. पुणेपोलिसांकडून उत्सवाच्या कालावधीत शहर, तसेच उपनगरात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले असून, सात हजार पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

उत्सवाच्या काळात संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटनांचा धोका विचारात घेऊन पुणे पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त जी. श्रीधर यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. उत्सवाच्या कालावधीत मध्यभागात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियाेजन केले आहे. भाविकांचे मोबाइल, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस कार्यरत असणार आहेत.

उत्सवाच्या कालावधीत पाच हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागवण्यात आलेले पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांचा बंदोबस्तामध्ये समावेश आहे. तसेच पोलिस मित्रांची मदत देखील घेतली जाणार आहे. मानाच्या मंडळांसह गर्दीच्या ठिकाणची बाॅम्बशाेधक, नाशक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. तर गर्दीच्या ठिकाणांची पथकातील प्रशिक्षित श्वान, पोलिस कर्मचारी गर्दीच्या ठिकाणाची दिवसभरातून चारवेळा तपासणी करण्यात येणार आहे.

१८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर 

शहरातील १८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दीवर नजर ठेवली जाणार आहेत. प्रत्येक मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना पोलिसांनी गणेश मंडळांना दिल्या आहेत. उत्सवाच्या कालावधीत शहरात राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागांतून नागरिक दर्शनासाठी येतात. परदेशी नागरिकांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती असते. त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून सराईतांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली.

रोडरोमिओंची धिंड काढणार

उत्सवाच्या कालावधीत महिलांकडील दागिने, मोबाइल चोरीच्या घटना घडतात. चोरट्यांना रोखण्यासाठी मध्यभागात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दीत महिलांची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना पकडून त्यांचे छायाचित्र चौकात लावण्यात येणार आहे. रोडरोमिओंची धिंडही काढण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

भाविकांसाठी मदत केंद्र 

उत्सवाच्या काळात शहरातील मध्यभागात १८ पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. उत्सवाची सांगता होईपर्यंत मदत केंद्रांचे कामकाज अहाेरात्र सुरू राहणार आहे. या केंद्रांत स्थानिक पोलिस ठाणे, विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात असणार आहेत. उत्सवाच्या कालावधीत ६ ठिकाणी शीघ्र कृती दल तैनात करण्यात येणार आहेत. हे जवान मनोऱ्यावरून गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत. गर्दीतील गैरप्रकार, तसेच संशयितांवर नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Web Title: 7000 policemen will keep strict security during Ganeshotsav in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.