ध्वनिप्रदूषणाचा ७१ मंडळांवर ठपका
By admin | Published: September 17, 2016 12:59 AM2016-09-17T00:59:57+5:302016-09-17T00:59:57+5:30
शहरातील गणेशोत्सवात अनेक गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले़ न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत
पिंपरी : शहरातील गणेशोत्सवात अनेक गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले़ न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत
उंचच उंच डीजेच्या भिंती लावत बाप्पाला निरोप देण्यात आला़ त्यामुळे गणेशोत्सवात परिमंडळ तीनच्या हद्दीतील ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७१ मंडळांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिली.
गेल्या ११ दिवसांपासून गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असताना, शहरातील काही ठरावीक गणेश मंडळे वगळता अनेक मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले़ ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा आदेश न्यायालयाने दिलेला होता़ त्यानुसार ११ दिवसांमध्ये शहरातील चतु:शृंगी १, सांगवी १०, हिंजवडी ७, वाकड २०, पिंपरी २१, भोसरी ७, निगडी ४, चिंचवड १ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मंडळांवर कारवाई करण्यात आली़ न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून ध्वनिमर्यादा कमी ठेवण्याचे आदेश होते़ मात्र, शहरातील गणेश मंडळांनी न्यायालयाचा आदेश धुडकावून डीजेचा आवाज मोठा करीत बाप्पांना निरोप दिला़ शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी नियम तोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती तेली यांनी दिली़ पिंपरी, वाकड, सांगवी, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक सार्वजनिक गणेश मंडळानी ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केले़ मात्र, एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत एकाही गणेश मंडळाने नियमाचे उल्लंघन केले नसल्यामुळे हद्दीतील मंडळांचे कौतुक होत आहे़
अनेक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमांचे उत्तम नियोजन केले होते़ काही
किरकोळ प्रकार वगळता शेवटच्या काही तासांमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव डीजेचा आवाज वाढविल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)