Pune: भोर शहरात ७१ धोकादायक इमारती, दुर्घटनेची शक्यता; नगरपलिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 01:16 PM2023-05-18T13:16:11+5:302023-05-18T13:20:02+5:30
भोर नगरपालिकेने शहरातील ७१ घरमालकांना त्यांची घरे व इमारती धोकादायक झाल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी खाली करा, दुरुस्त करा किंवा पाडण्याच्या नोटीस बजावल्या आहेत...
भोर (पुणे) :भोर शहरातील काही जुनी घरे व इमारती मिळून ७१ मालमत्ता धोकादायक स्थितीमध्ये असून, त्याच्या बाजूलाचा अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या धोकादायक इमारती खाली करता येत नाहीत किंवा त्याची डागडुजीही करता येत नाही. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. नगरपलिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नोटिसा दिल्या जातात. मात्र, इमारती आहे तशाच राहतात. कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
भोर नगरपालिकेने शहरातील ७१ घरमालकांना त्यांची घरे व इमारती धोकादायक झाल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी खाली करा, दुरुस्त करा किंवा पाडण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यापैकी १८ इमारतींमध्ये कोणीही राहत नाहीत, तसेच उर्वरित काही घरमालकांना घर खाली करण्याची आणि नवीन बांधकाम करण्याची इच्छा आहे. परंतु, घराच्या भिंतीलगत झालेल्या अतिक्रमणांमुळे त्यांना घर पाडताही येत नाही आणि नवीन बांधताही येत नाही. त्यामुळे धोकादायक इमारती आहे तशाच राहून धोका कायम आहे. मात्र, त्या इमारतीच्या आजूबाजूला अतिक्रमणे झालेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी धोका कायम असून, लोकांना बांधकाम करता येत नाही आणि धोकादायक इमारतीमुळे धोका आहे तसाच कायम राहत आहे.
दरम्यान, भोर शहरात दिवसेंदिवस धोकादायक इमारतीमध्ये वाढ होत आहे. सध्या पावसाळा सुरू होण्यास एक महिना राहिला असून, जीर्ण झालेल्या इमारती अधिक धोकादायक झाल्या आहेत. एक इमारत पडल्यास त्याच्या फटका शेजारच्या इमारतीलाही बसणार असल्याने धोका वाढला आहे. महिला व मुलांचा घरात २४ तास वावर आहे. मुलांचे खेळणे, उड्या मारण्यानेही इमारत हादरते आहे. वादळी वारे, पावसामुळे छप्पर उडणे, भिंती पडणे या घटना घडू शकतात. त्यामुळे एखादी इमारत पडून धोका होऊ शकतो.
शहरातील जुनी घरे ५० वर्षांपूर्वीची असून, त्याच्या शेजारील अतिक्रमणेही सुमारे १० ते १५ वर्षांपासून आहेत. अशा सर्व अतिक्रमणांना महावितरणने वीजपुरवठाही केलेला आहे. त्यामुळे कित्येक वर्षे नगरपालिकेला कुठलाही कर न भरता संबंधित अतिक्रमणधारक राजरोसपणे व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे अशी अतिक्रमणे त्वरित हटवावीत अशी मागणी भोर शहरातील घरमालक करीत आहेत. काही घरमालकांनी तर आपापल्या परीने धोकादायक इमारतींची दुरुस्ती सुरू केली आहे. नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन अतिक्रमण करणाऱ्यांवर कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जुन्या धोकादायक इमारती असलेल्या मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या असून, धोकादायक भाग काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यापासून धोका निर्माण झाल्यास मालमत्ताधारकाला जबाबदार धरले जाणार आहे. ज्या जुन्या इमारती रिकाम्या करण्यासाठी अतिक्रमणांचा अडथळा होत असेल, त्या मालकांनी नगरपालिकेकडे रीतसर अर्ज करावा. नगरपालिका प्रशासनाकडून त्याची खातरजमा करून तेथील अतिक्रमणे काढून टाकण्यात येतील.
- हेमंत किरुळकर मुख्याधिकारी, भोर न.पा.