Corona Vaccination : पुणे जिल्ह्यात १८ वर्षांवरील ३८ लाख नागरिकांचा लसीचा पहिला डोस राहिला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 08:24 PM2021-08-04T20:24:26+5:302021-08-04T22:10:37+5:30
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे
पुणे : जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १ कोटी १७ लाख ४८ हजार ६३६ इतकी आहे. सध्या ४६ लाख ४४ हजार ४५७ नागरिकांचा पहिला डोस तर १६ लाख १३ हजार ५१० नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. याचाच अर्थ अजून सुमारे ७१ लाख नागरिकांचा पहिला डोस घेणे बाकी आहे.
सध्या दररोज ५० ते ६० हजार लसीकरण होत आहे. गेल्या आठवड्यात केवळ दोनदा ९० हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. नवीन व्हेरियंट धोकादायक ठरत असताना तिसरा डोस द्यावा लागेल का, याबाबत अभ्यास सुरु असताना पहिले दोन डोस लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार आहेत.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. लाट थोपवण्याच्या दृष्टीने लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५४ टक्के नागरिकांचा पहिला डोस, तर १९ टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला आहे. २१ जूननंतर लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग मिळाला. त्यानंतर आजपर्यंत केवळ पाच वेळा जिल्ह्यात एका दिवशी एक लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दररोज लसीकरण एक लाखाहून अधिक होणे आवश्यक आहे.
देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुस-या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तिस-या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले रुग्ण, चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिक, तर पाचव्या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. अजूनही पहिल्या टप्प्यातील १०० टक्के कर्मचा-यांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झालेले नाही. ७९ टक्के आरोग्य कर्मचा-यांना पहिला डोस, तर ५८ टक्के नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे.
जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती : (कंसात टक्केवारी)
पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी १,५७,०३८ (७९) १,१५,४२५ (५८)
अत्यावश्यक कर्मचारी २,५५,९३५ (९०) १,६९,५७९ (६०)
६० वर्षांवरील ९,४०,१४७ (७२) ५,७९,२३८ (४५)
४५ ते ५९ ११,६२,११२ (६०) ६,५३,५८२ (३४)
१८ ते ४४ ४२,३१,४८४ (५३) १३,२८,५०६ (१६)
---------------------------------------------------------------------------------
एकूण ४६,४४,४५७ (५४) १६,१३,५१० (१९)
--------------------------------------------------------------------------------------------------------
१ लाखांहून अधिक लसीकरण
२५ जून - १,४३,६३९
२६ जून - १,१५,९४३
२८ जून - १,०४,१४४
३ जुले - १,०४,२४९
१० जुले - १,१९,७०६