दुर्गप्रेमीकडून तब्बल ७१० फुट ‘बाण’ सुळका केला सर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 11:00 PM2020-01-25T23:00:00+5:302020-01-25T23:00:02+5:30
तब्बल ११० गिरीप्रेमींनी ९ दिवस झटत ही मोहिम केली फत्ते
पुणे : अत्यंत अवघड मानल्या जाणाऱ्या अहमदनगरमधील तब्बल ७१० फुट उंचीच्या बाण सुळक्यावर सुरक्षित बोल्ट लावण्याची कामगिरी पुण्यातील दुर्गप्रेमी संस्थेने केली आहे. तब्बल ११० गिरीप्रेमींनी ९ दिवस झटत ही मोहिम फत्ते केली. पुढील पन्नास वर्षे या बोल्टच्या सहाय्याने गिर्यारोहकांना सुळका सर करता येणार आहे. दुर्गप्रेमी आणि सेफ क्लायबिंग इनिशिएटीव्ह अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली होती. पुर्वीच्या मार्गावरील खराब झालेले बोल्ट बदलण्यात आले. त्यासाठी अत्यंत मजबूत असे महात्मा गांधी (एमजी) बोल्ट वापरण्यात आले आहेत. या सुळक्यावरील चढाई आता सुरक्षित झाली आहे. रमेश वैद्य आणि निहार सोले यांच्या नेतृत्वाखाली ५ जानेवारी ते १३ जानेवारी २०२० दरम्यान मोहीम पूर्ण केल्याची माहिती दुर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल पिसाळ आणि सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्हचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र पाटील यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील सांधण दरी जवळच्या साम्रद गावाजवळ बाण सुळका आहे. सह्याद्री पर्वत रांगांमघील अत्यंत अवघड असा सुळका मानला जातो. प्रकल्पाच्या पहिल्या तीन दिवसांत सुळक्याची काठिण्य पातळी, मार्गातील अडथळे आणि बदल विवेक मराठे यांनी समजावून सांगितले. सेफ क्लायम्बिंग इनिशिएटिव्हचे संस्थापक सदस्य स्वानंद जोशी यांनी बोल्ट बदलताना जुना मार्ग कायम राहून, त्याच्या काठिण्य पातळीतही बदल होणार नाही याची दक्षता घेतली. मेहबूब मुजावर आणि विनोद कंबोज यांनी बोल्टींगचे मार्गदर्शन केले. निलराज माने, नुवाजीश पटेल, अमोल रणदिवे, लहू उखाडे, गीतेश बांगरे, रोहन फंड, कृष्णा मरगळे, मॅकमोहन, कृष्णा बचुते, युवराज किनिंगे, स्वप्नील गरड यांनी त्यांना सहकार्य केले. काही जणांनी अन्न-पाण्याची व्यवस्था करणे, ड्रिल मशिन चार्ज करणे, तांत्रिक उपकरणे पुरविण्याची जबाबदारी घेतली होती. बेस कॅम्प साम्रद गावातून ६ किलोमीटर अंतरावर टाकण्यात आला होता. बाणाच्या पायथ्याला जाण्यासाठी डोंगराळ भागातून खडा चढ चढल्यानंतर तीव्र उतार लागतो. तसेच, सुळका बेस कॅम्पपासून सुमारे २ तास अंतरावर आहे. हे सर्व अडथळे पार करीत संघातील सदस्यांनी सर्व उपकरणे आणि शिधा सामग्री सुळक्या पर्यंत पोचविली. साहित्य नेण्यासाठी रतनगडाच्या घळीतील वाटेत एका ठिकाणी झिप लाईन टाकण्यात आली होती. जवळपास आठ ते नऊ दिवस काम करीत १४ जानेवारी रोजी मोहीम पूर्ण केली.
---------------------पहिल्यांदा १९८४ साली सुळका झाला सरबाण सुळका दिवंगत गिर्यारोहक मिलिंद पाठक आणि त्यांच्या संघाने १९८६ साली सर केला. त्यानंतर विवेक मराठे आणि त्यांच्या पथकाने १९९१ साली या सुळक्यावर यशस्वी चढाई केली. पाण्याचे दुर्भिक्ष्य, मधमाश्यांची मोठमोठी पोळी, अतिशय दुर्गम प्रदेश आणि अत्यंत खडतर चढाई या मुळे गिर्यारोहकांना हा सुळका आव्हान देत असतो.
----------
असा आहे महात्मा गांधी बोल्ट
नवीन महात्मा गांधी (एमजी) बोल्ट व्ही२ए स्टीलचे आहेत. हे स्टील बोल्ट गंजमुक्त असून, त्यांचे किमान आयुष्य ५० वर्षे आहे. तसेच, कमीतकमी ३ हजार किलो वजन पेलण्याची क्षमता आहे. जर्मन गिर्यारोहक निकोलस मायलँडर यांनी २००३ साली योग अभ्यासासाठी भारताला भेट दिली होती. त्यावेळी सह्याद्रीमधधील नागफणीवर चढाई करताना बोल्ट खराब असल्याचे सांगत त्यांनी चढाई करु नका असा सल्ला दिला. तसेच, भारतीय हवामानासाठी व्ही-२ ए स्टील बोल्टची शिफारस करुन, त्याचे नामकरण महात्मा गांधी (एमजी) बोल्ट असे केले.
-