पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधून अकरावीसाठी ७१ हजार अर्ज
By admin | Published: June 18, 2016 03:28 AM2016-06-18T03:28:39+5:302016-06-18T03:28:39+5:30
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
पुणे : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुमारे ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. रात्री उशिरापर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने अर्जांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे माहिती केंद्रीय प्रवेश समितीने स्पष्ट केले. इयत्ता अकरावीच्या सुमारे ७४ हजार जागांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७१ हजार २५८ एवढी होती. प्रत्यक्षात आॅनलाइन अर्जासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा तब्बल ८३ हजार ४८१ एवढा आहे, तर त्यापैकी ७७ हजार ५२१ विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरलेला आहे. शुक्रवारी साडेपाच वाजेपर्यंत अर्जाचा पहिला भाग भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५ ते ६ हजार विद्यार्थ्यांनी दुसरा भाग भरलेला नव्हता. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश समितीने रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेशाची आॅनलाइन लिंक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकूण प्रवेश अर्जांची संख्या वाढू शकते. शुक्रवारी अर्ज अंतिम करण्याची अखेरची संधी होती. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे समितीच्या सचिव मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. केंद्रीय प्रवेशप्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी २७ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे; तसेच व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक आणि शाळांतर्गत कोटा प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १८ जून असणार आहे. सर्व तीनही कोट्यातील प्रवेशांसाठीची पहिली गुणवत्ता यादी २१ व २२ जूनला प्रसिद्ध होईल.
विविध महाविद्यालयांनी अल्पसंख्याक, शाळांतर्गत आणि व्यवस्थापन कोट्यातील
1442
प्रवेश केंद्रीय समितीकडे सरेंडर केले आहेत. त्यामुळे प्रवेशक्षमता वाढली आहे.
71258
सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश अर्जाचे दोन्ही भाग भरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
77521
विद्यार्थ्यांनी अर्जाचा पहिला भाग भरला आहे.
अकरावीच्या ७४ हजार जागांसाठी आॅनलाइन प्रक्रिया