‘मेरे चारों तरफ बम लगा है’, ७२ वर्षीय महिलेची पुणे विमानतळ उडवून देण्याची धमकी
By नितीश गोवंडे | Published: August 4, 2023 03:23 PM2023-08-04T15:23:33+5:302023-08-04T15:24:12+5:30
सीआयएसएफच्या जवांनांनी महिलेला ताब्यात घेत तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले
पुणे: लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी आलेल्या एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे फिस्कींग बुथमध्ये बसलेल्या सीआयएसएफ च्या जवांनाना सांगितले. त्यामुळे विमानतळावर तपास यंत्रणांची एकच धावपळ उडाली. अखेर योग्य ती खबरदारी बाळगत सुरक्षितरित्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीता प्रकाश कृपलानी (७२, रा. गुडगाव औद्योगिक वसाहत) असे अटक करण्यात आलेले महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सीएसआयएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) च्या महिला पोलिस शिपाई दीपाली बबनराव झावरे (३३, रा. लोहगाव) यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी आरोपी महिला नीता कृपलानी या विमानतळावर फ्रिस्किंग बूथ समोर आल्या असता, तेथे उपस्थित असलेल्या सीआयएसएफ च्या जवानांकडे बघत त्यांनी ‘मेरे चारों तरफ बम लगा है’ असे सांगितले. यामुळे विमानतळावर एकच गोंधळ उडाला. सीआयएसएफच्या जवांनांनी महिलेला ताब्यात घेत तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले आणि सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याप्रकरणी या ज्येष्ठ महिलेविरोधात खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. आर. करपे करत आहेत.