जीएमआरटीच्या विज्ञान प्रदर्शनात ७३५ प्रकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:21 AM2021-02-28T04:21:05+5:302021-02-28T04:21:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक विज्ञान दिनानिमित्त खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनाला ...

735 projects presented in GMRT's science fair | जीएमआरटीच्या विज्ञान प्रदर्शनात ७३५ प्रकल्प सादर

जीएमआरटीच्या विज्ञान प्रदर्शनात ७३५ प्रकल्प सादर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक विज्ञान दिनानिमित्त खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनाला राज्यासह देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. देशातील ३३० शाळांनी सहभाग घेऊन सुमारे ७३५ विविध प्रयोग व प्रकल्प सादर केल्याची माहिती एनसीआरएचे वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी दिली.

ऑनलाइन असलेल्या या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या रविवारी (दि.२८) सकाळी मुंबईतील केंद्रीय अणुऊर्जा खात्याचे संशोधन व विकास विभागाचे संयुक्त सचिव सुषमा ताईशेटे यांच्या हस्ते तर एनसीआरचे संचालक प्रो. यशवंत गुप्ता व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांच्या उपस्थितीत होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने या प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. जीएमआरटीचे प्रदर्शनदेखील ध्वनी आणि चित्रफितीच्या माध्यमातून दाखवले जाणार आहे. एनसीआरच्या जीएमआरटी सायन्स डे २०-२१ या वेबपेजवर हे प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

मागील १८ वर्षांपासून खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी होणारे विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन असून ते देशभर प्रसिद्ध आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे विज्ञान प्रदर्शन रद्द करून ऑनलाइन आयोजित केले आहे. ऑनलाइन सहभागामुळे हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता यावर्षी कोरोनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभर पोहचले आहे. संपूर्ण देशातून या विज्ञान प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालत अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी ऑनलाइन प्रदर्शनाच्या माध्यमातून डिजिटल इंडियाचे दर्शन घडविले आहे.

विज्ञान प्रयोगांचे ऑनलाइन प्रदर्शन ग्रोईंग डाॅट या मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी घरच्या घरी अनेक विज्ञान प्रयोग व प्रकल्प तयार करून ऑनलाइन प्रदर्शनासाठी प्रोजेक्ट व्हिडीओ अपलोड केले आहेत. कोविडमुळे ऑनलाइन प्रदर्शनात भाग घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे खऱ्या अर्थाने डिजिटल इंडिया पाहावयास मिळणार आहे.

कोट

जगातील सर्वाधिक मोठी रेडिओ दुर्बिण म्हणून ओळखला जाणाऱ्या जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पात दरवर्षी विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या विज्ञान प्रदर्शनात देशभरातील शाळा व महाविद्यालये सहभाग घेत असतात. दोन दिवसांत या विज्ञान प्रदर्शनाला देशातून सुमारे २५ हजार विद्यार्थी भेटी देत असतात. दरवर्षी प्रत्यक्ष आयोजित केलेल्या या विज्ञान प्रदर्शनात सुमारे ४० ते ४५ शाळा, ३० ते ३५ महाविद्यालये सहभाग घेत सुमारे प्रकल्प २५० सादर केले जायचे. मात्र यावर्षी ऑनलाईन प्रदर्शनाला अनपेक्षित असा प्रतिसाद मिळाला आहे. - डॉ. जे. के. सोळंकी

वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, एनसीआर,पुणे

कोट

कोरोना महामारीमुळे यावर्षी जीएमआरटीने आयोजित केलेल्या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक वाटते. विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक जीवनात विज्ञानाची आवड निर्माण होऊन त्यांच्यातील वैज्ञानिक गुणांना वाव मिळावा व त्यातून एखादा चांगला शास्त्रज्ञ निर्माण होऊन देशाचे नाव उंचवावे, हा जीएमआरटी विज्ञान दिवसाचा उद्देश आहे. रविवारी या जीएमआरटी विज्ञान दिवसाचे उद्घाटन होणार असून सर्वानी याचा लाभ घ्यावा व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रस्तुत केलेले प्रयोग पाहावेत व त्यांना प्रोत्साहन द्यावे.

- अभिजित जोंधळे

प्रशासकीय अधिकारी जीएमआरटी प्रकल्प,

खोडद, ता. जुन्नर

कॅप्शन : जागतिक विज्ञान दिनानिमित्त जीएमआरटीने आयोजित केलेल्या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प सादर करताना विद्यार्थी व विद्यार्थिनी.

Web Title: 735 projects presented in GMRT's science fair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.