जलसंधारणासाठी ७४ हजार तास विनामूल्य सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 04:11 AM2017-08-08T04:11:56+5:302017-08-08T04:11:56+5:30
सामाजिक क्षेत्रामध्ये ३२ वर्षांपासून अधिक काळ काम करीत असलेल्या भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) आजवर २० पेक्षा अधिक नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतकार्य उभे केले आहे. शैक्षणिक कार्यातही संघटनेचे मोठे योगदान आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सामाजिक क्षेत्रामध्ये ३२ वर्षांपासून अधिक काळ काम करीत असलेल्या भारतीय जैन संघटनेच्यावतीने (बीजेएस) आजवर २० पेक्षा अधिक नैसर्गिक आपत्तींमध्ये मदतकार्य उभे केले आहे. शैक्षणिक कार्यातही संघटनेचे मोठे योगदान आहे. ‘पानी फाउंडेशन’च्या वॉटर कप स्पर्धेचे वेगळेपण लक्षात घेऊन विविध गावांमध्ये जेसीबी, पोकलेनसह आवश्यक मशीनरी पुरवण्यात आली. जवळपास ७३ हजार ६९८ तास ही विनामूल्य सेवा पुरविण्यात आली, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी दिली.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यामध्ये रविवारी बीजेएसने केलेल्या कामाचे विशेष कौतुक करण्यात आले. बक्षीस विजेत्या गावांसह जलसंधारणाच्या कामामध्ये सहभाग घेणाऱ्या संस्थांचाही सत्कार करण्यात आला. मुथ्था म्हणाले, भारतीय जैन संघटनेने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची एक हजार मुले दत्तक घेतली आहेत. या मुलांनीही श्रमदान करुन पाणी बचतीचा संदेश दिला आहे. लातुर-किल्लारीला झालेल्या भूकंपात मातापित्यांचे छत्र गमावलेल्या बाराशे मुलांचा सांभाळ संस्थेने केला. वॉटर कपचे काम वेगळे आहे. आमिर खान आणि सत्यजीत भटकळ यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या. जी गावे आपले उद्दिष्ट पूर्ण करतील त्यांना मशीनरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. काही भागात परराज्यातून मशीनरी आणण्यात आली. संघटनेचे ६०० कार्यकर्ते सहभागी झाले होते.