आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर दोन वेळा बायपास झालेल्या ७४ वर्षीय पैलवानाची कोरोनावर मात...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 06:42 PM2021-05-06T18:42:21+5:302021-05-06T18:56:37+5:30
डॉक्टरही झाले आश्चर्यचकित
माळेगाव खुर्द: कोरोनाला हारवण्यासाठी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाची गरज असते. अनेकांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना ऐकण्यात येत आहेत. पण त्याचबरोबर प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावरही लोकांनी कोरोनावर मात केली आहे. बारामती तालुक्यातील पैलवान दादासो बडे त्यापैकीच एक आहेत.
बडे आयुष्याचा गाडा हाकताना दोनदा बायपास सर्जरी झाली. मात्र प्रचंड कष्ट, संकटाला सामोरे जाण्याची क्षमता आदीच्या जोरावर या आजारावर मात करून दुग्ध व्यवसाय चालू ठेवला. काही दिवसांपूर्वी त्यांना डेंगुचा आजार झाला होता. त्यावरही यशस्वीरित्या मात केली. पण पुन्हा तब्येत बिघडल्याने त्यांनी कोरोना तपासणी केली. अखेर कोरोनाने त्यांना गाठले. त्याबरोबरच निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले.
बारामती येथील डाॅ.गोकुळ काळेच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. डॉक्टरांनी कुटुंबाकडून त्यांची आरोग्यविषयक माहिती घेतली. व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासेल असेही सांगितले. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले.
या सर्व घडत असताना पैलवान बडे मात्र निर्धास्त होते. मला काही होणार नाही? मी आजाराला घाबरत नाही? डॉक्टर तुम्ही उपचार करा असे सांगणारे पैलवान बडे आठ दिवसातच ठणठणीत बरे झाले. या आठ दिवसात डॉक्टरांनीही मेहनत घेतली. पैलवान बडेंच्या कुटुंबाकडून योग्य काळजी घेतली गेली. सकाळी नाष्ट्याला उपमा किंवा शिरा यासोबतच सकस व पौष्टिक आहार देऊन देखभाल केली. खरे तर दादासो बडे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुध्दा अचंबित झाले आहेत. कारण जिथं रुग्ण बचावण्याची शक्यता कमी असताना रुग्णाच्या आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा उभारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
"मी कोरोनाची भिती बाळगली नाही.योग्य आहार घेतला.पैलवानकीचे शरीर आहे.काय होणार नाही हा विश्वास होता. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व उर्मी होती.त्यामुळे कोरोनाला हरवून जीवनाची कुस्ती पुन्हा जिंकली." असे बडे यांनी यावेळी सांगितले.