बापरे! पोर्शे प्रकरणानंतर पुण्यात ७५ अपघात; ३३ जणांचा मृत्यू, बेजबाबदार चालक, सुस्त प्रशासन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 03:24 PM2024-06-18T15:24:41+5:302024-06-18T15:24:56+5:30
दाखल झालेल्या अपघातांच्या या सात ते आठ घटनांमध्ये चालक अपघातानंतर पळून गेल्याची नोंद, काही घटनांमध्ये चालकच मद्यपी
पुणे: निसर्गसंपन्न, शांत, सुंदर आणि सुरक्षित पुणे मागील काही वर्षांत वाहतूक कोंडीचे आगार आणि अपघातांचे स्पाॅट बनले आहे. स्मार्ट पुण्यात अवघ्या २५ दिवसांत ७० अपघात हाेऊन ३१ जणांचा बळी गेला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू असून, ते थांबण्याचे नाव घेत नाही. बेजबाबदार चालक, सुस्त प्रशासन आणि उखडलेले रस्ते या रूपाने पुण्याच्या रस्त्यावर यमदूत तर फिरत नाही ना? असा प्रश्न पडू लागला आहे.
कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघाताला बुधवारी १ महिना होत आहे. या घटनेनंतरही शहरात अपघातांचे
सत्र सुरू आहे. गेल्या २८ दिवसांमध्ये शहरात अपघातांच्या ७५ हून अधिक घटना घडल्या असून, त्यात ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस दप्तरी दाखल असलेल्या गुन्ह्यांवरून ही बाब समोर आली आहे.
पाेर्शे कार अपघाताच्या धर्तीवर १९ मे ते १७ जूनपर्यंत शहरातील अपघातांच्या घटनांचा आढावा घेतला असता, ही बाब समोर आली. या अपघातांत ६० जण किरकोळ आणि गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. सर्वांत जास्त अपघातांच्या घटना हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत, त्यापाठोपाठ भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे आढळून आले आहे.
काही चालक मद्यपी, तर काही पसार...
दाखल झालेल्या अपघातांच्या या सात ते आठ घटनांमध्ये चालक अपघातानंतर पळून गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर काही घटनांमध्ये चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याची नोंद करण्यात आली आहे.
ड्रंक ॲण्ड ड्राइव्हची ८६२ प्रकरणे
मद्यधुंद अल्पवयीन कार चालकाने १९ मे रोजी केलेल्या अपघातानंतर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून ड्रंक ॲण्ड ड्राइव्हच्या कारवाईने वेग घेतला. २१ मे ते १७ जूनदरम्यान पोलिसांनी शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी करून ८६२ जणांवर मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील गेल्या तीन वर्षांतील अपघातांची आकडेवारी..
वर्ष | गंभीर अपघात | मृत व्यक्ती | गंभीर जखमी |
२०२१ | ३९१ | २५५ | ४५७ |
२०२२ | ४५२ | ३२५ | ५०७ |
२०२३ | ६०७ | ३५१ | ६९५ |
गेल्या ३ वर्षात अपघातांमध्ये मृतांचा आकडा वाढताना दिसतोय. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. २०२४ च्या ६ महिन्यातच वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे -
२०२४ | ३२८ | १६९ | ३७० |