महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकरसाठी पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर डेपोतून एसटीच्या ७५ जादा बस
By अविनाश रावसाहेब ढगे | Published: March 2, 2024 03:49 PM2024-03-02T15:49:36+5:302024-03-02T15:53:09+5:30
शिंगणापूर, निळकंठेश्वरसह इतर देवस्थनासाठी ४२ बस...
पिंपरी : महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ७ ते १० मार्च दरम्यान ७५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर आणि राजगुरूनगर डेपोतून या बस सोडण्यात येतील.
यंदा एसटी महामंडळाकडून सात मार्चपासून भीमाशंकरसाठी जादा बस सोडण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. शिवाजीनगर आगार येथून भिमाशंकरसाठी १५ बस सोडल्या जाणार आहेत. तर, स्वारगेट येथून दोन, नारायणगाव १६, राजगुरूनगर १९, पिंपरी-चिंचवड येथून ५, बारामती, इंदापूर, सासवड येथून प्रत्येक दोन, भोर व दौंड येथून प्रत्येकी तीन बस सोडण्याचे नियोजन आहे. भीमाशंकर बस स्थानकापासून भाविकांना मंदिरापर्यंत एसटीकडून शटल सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
शिंगणापूर, निळकंठेश्वरसह इतर देवस्थनासाठी ४२ बस
पुणे जिल्ह्यात आणि परिसरात शंकराची विविध देवस्थाने आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिंगणापूर, निळकंठेश्वर, रामलिंग, कुकडेश्वर, सोमेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक जात असतात. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाने या देवस्थानांना जाणाऱ्या भाविकांसाठी ४२ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. निळकंठेश्वरला जाण्यासाठी स्वारगेट आगार येथून १० बस सोडल्या जाणार आहेत. त्याबरोबरच भोर व सासवड येथून बस सोडण्यात येतील. तर, शिंगणापूरला बारामती व इंदापूर येथून सहा बस सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.