राज्यभरात ७५ नवीन नाट्यगृहे साकारणार; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन
By श्रीकिशन काळे | Published: November 21, 2023 02:22 PM2023-11-21T14:22:15+5:302023-11-21T14:22:54+5:30
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असल्याने ७५ नाट्यगृहे उभारण्यात येतील, अशी घोषणा मुनगंटीवार यांनी केली
पुणे : राज्यात नाट्यगृहांची संख्या कमी आहे. त्यामुळे नाटकांना चांगले व्यासपीठ मिळण्यासाठी राज्य सरकार ७५ ठिकाणी नवीन नाट्यगृहे बांधणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असल्याने ७५ नाट्यगृहे उभारण्यात येतील, अशी घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६२ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला पुण्यात भरत नाट्य मंदिर येथे सुरवात झाली. त्याप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते. या वेळी भरत नाट्यमंदिर मध्ये अभिनेत्री जयमाला इनामदार, बॅकस्टेज कर्मचारी बाळकृष्ण कलाल आणि परीक्षक अनुया बाम, चंद्रकांत झाडकर, जुगलकिशोर ओझा उपस्थित होते. पुणे केंद्रावर २३ नाटके सादर होणार आहेत. ‘अभिजात, पुणे’ या संस्थेने ‘गिऱ्हाण’ नाटक सादर केले. त्यानंतर प्राथमिक फेरी सुरू झाली. प्राथमिक फेरीत एकूण २३ संघांचे सादरीकरण १४ डिसेंबरपर्यंत होणार आहे.
राज्य सरकारची ही स्पर्धा आहे. तरी देखील स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमा खूप कमी आहेत. त्यामध्ये देखील वाढ करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले आहे. राज्यामध्ये सांस्कृतिक विभागाचे केवळ एकच नाट्यगृह आहे. इतर सर्व नाट्यगृहे स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. त्यामुळे राज्य सरकार आता ७५ नाट्यगृहे उभारणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
आमचे नाटक ‘गिऱ्हाण’ने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सुरुवात झाली. मी अण्णा भाऊ साठे यांची एक कथा वाचली होती. त्यात त्यांनी जुन्या चालीरीती किती वाईट आहेत आणि त्यामुळे समाजावर त्याचा पगडा आहे, ते सांगितले होते. आजही अनेक अनिष्ट चालीरीती आहेत. शिक्षण मिळाल्याने त्या दूर होऊ शकतात. आम्ही ‘गिऱ्हाण’मध्ये जागरण गोंधळ, संबळ यांचा वापर करून नाटक सादर केले. दिग्दर्शन अमर गायकवाड यांनी केले आहे. दीड महिन्यापासून आम्ही तालमी करत होतो. - अमोल जाधव, लेखक, गिऱ्हाण