सात महिन्यांत ७५ जणांचा बळी

By admin | Published: July 28, 2016 04:01 AM2016-07-28T04:01:33+5:302016-07-28T04:01:33+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या १० दिवसांत कामशेतजवळ झालेल्या दोन अपघातांत पुण्यातील नऊ जणांना जीव गमवावा लागला आहे. अतिवेगात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने

75 people killed in seven months | सात महिन्यांत ७५ जणांचा बळी

सात महिन्यांत ७५ जणांचा बळी

Next

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गेल्या १० दिवसांत कामशेतजवळ झालेल्या दोन अपघातांत पुण्यातील नऊ जणांना जीव गमवावा लागला आहे. अतिवेगात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे दोन्ही अपघात झाले आहेत. मागील सात महिन्यांत द्रुतगती महामार्गावर जवळपास दोनशे अपघात झाले असून, यामध्ये ७५पेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. मानवी चुकांबरोबरच महामार्गाची सदोष बांधणीही अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचा आरोप होत आहे.

द्रुतगती मार्गावरील अपघातांची वाढती संख्या व मृत्यूच्या घटना हृदय हेलावणाऱ्या आहेत. द्रुतगती महामार्ग हा शून्य अपघात मार्ग बनविण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. याकरिता मागील दोन महिन्यांपासून द्रुतगतीवर महामार्ग पोलिसांनी विशेष कारवाई मोहीम राबवीत वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या ६५५ वाहनांवर कारवाई करीत एक लाख ३१ हजार रुपये दंड वसूल केला. लेनच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या तब्बल ७६१६ वाहनांवर कारवाई करत सात लाख ६५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. कारवाईचा बडगा सुरू असतानाही या मार्गावर वाहनचालकांचा बेशिस्तपणा कोठेही कमी होताना दिसत नसल्याने महामार्गावर अपघातांची व मृतांची संख्या दिवसगणिक वाढत आहे.
जागोजागी द्रुतगती महामार्ग फुटला आहे. काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी भेगा पडल्या आहेत. याकडे यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने या चुका अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. वाहनांचा अतिवेग व सदोष रस्ता यामुळे द्रुतगतीवर बळींची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. द्रुतगतीवर वाहनाची वेगमर्यादा ८० किमी प्रतितास ठेवण्यात आली असली, तरी या मार्गावर सरासरी १०० ते १५० च्या वेगाने वाहने चालवली जातात. काही वाहनांचा वेग तर याहून अधिक असतो. अतिवेगातील वाहनांवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविता येत नसल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात वाढले आहेत. वाहनांचा हा वेग मोजण्यासाठी व कारवाई करण्यासाठी आजही संबंधित यंत्रणांकडे साधनांची कमतरता आहे. अपघातांना मानवी चुका जबाबदार असल्याचा अहवाल देत यंत्रणा हात वर करण्याचे काम करतात. मात्र, रस्त्यांची सदोषनिर्मिती व शासनाची अनास्था यामुळे या मार्गावर मृतांची संख्या वाढत आहे. मोठ्या दुर्घटना घडल्या, की बडे अधिकारी व मंत्री या मार्गाची पाहणी करत सुरक्षेसंदर्भात सूचना देऊन प्रसिद्धी मिळवतात. पण, पुढे काहीच होत नाही. २००४मध्ये मंजूर झालेले ट्रॉमा केअर सेंटर १२ वर्षांनंतरही सुरू झालेले नाही. महामार्ग पोलिसांना कालबाह्य झालेली वाहने घेऊन मार्गावर गस्त घालावी लागते. जागोजागी मदत चौक्या उभारलेल्या आहेत. मात्र, कर्मचारी संख्या अपुरी असल्यामुळे चौक्या धूळ खात पडल्या आहेत. गोल्डन अवरमध्ये जखमींना उपचार देण्याच्या गप्पा कायम मारल्या जातात. मात्र, त्या दृष्टीने पावले उचलली जात नाहीत. राज्य व देशात सर्वांत जास्त जीव रस्ते अपघातांमध्ये जात असतानाही हा संवेदनशील विषय कोणी गांभीर्याने घेत नाही. मुंबई-पुणे हा प्रवास जलदगती व्हावा, याकरिता द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र, हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. (वार्ताहर)

मानवी चुकांप्रमाणे या मार्गाची सदोषनिर्मिती हे देखील अपघातांमागील मोठे कारण आहे. मात्र याचा अहवाल कोणत्याही यंत्रणांनी अद्याप तयार केलेला नाही. भारतातील पहिला द्रुतगती महामार्ग अशी ओळख असणारा हा महामार्ग ठरावीक भाग वगळता अन्य कोठेही समांतर नाही. वाहने धडधडत चालतात. याच सदोष कारणामुळे अनेक वेळा वेगातील वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात घडत आहेत. दोष दूर करण्याबाबत रस्ते विकास महामंडळ व आयआरबी कंपनीकडून कसलीही उपाययोजना झालेली नाही.
---------------------------------------------

चालकाला वेगाची नशा, कुटुंबाची मात्र होतेय दशा
वडगाव मावळ : मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर मंगळवारी (दि. २६) झालेल्या अपघातात सहाजणांचा बळी गेला. या भीषण अपघातामुळे दु्रतगतीवरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर उर्से टोलनाका ते बऊर दरम्यान दहा ते बारा अपघात झाले असून, त्यात १३ जणांचे बळी गेले आहेत. जवळपास २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. सततच्या अपघातांमुळे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे. दहा दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघातात तीनजण ठार झाले होते. याला प्रमुख कारण वाहनांचा अतिवेग असल्याचे सांगितले जाते. वेगमर्यादेसंदर्भात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतच आहे.
मुंबई आणि पुणे शहरांतील प्रवास वेगवान करण्यासाठी तयार केलेल्या ९४.५ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम २००२ मध्ये पूर्ण झाले. त्यामुळे मुंबई ते पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास चार-पाच तासांवरून थेट दोन तासांवर आला. याचा परिणाम म्हणून मागील १४ वर्षांत या महामार्गावरील वाहतूक वाढली. सुसाट व अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढली. दिवसाआड होणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग असुरक्षित बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे बऊर ते उर्से टोलनाका दरम्यान जवळपास पन्नास ते साठ जण कायमचे जायबंदी झाले आहेत.
या टप्प्यात होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणे किती धोकादायक आहे, हे मंगळवारच्या अपघातावरून पुन्हा समोर आले. वाहनचालकांचा आततायीपणा आणि वाढलेल्या वाहतुकीमुळे मागील सहा महिन्यांत या महामार्गाने अनेकांचे जीवन संपविले आहे. २६ जुलैची पहाट तर द्रुतगतीवर मृत्यूचे तांडव करून गेली. वेगाची नशा आणि कमकुवत सुरक्षायंत्रणा यामुळे द्रुुतगती मार्गावर वारंवार अपघात होत आहेत. महामार्गावर वेगमर्यादा असली, तरी खासगी बस व मोटारचालकांना वेगाची नशा चढत असल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
काही अपघात सुरक्षिततेच्या तोकड्या उपाययोजनांमुळे होत आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गाच्या दोन्ही बाजंूना दगडी बांधकाम करून संरक्षक भिंत, तर काही ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. जेणेकरून पादचारी, गुरेढोरे यांना प्रतिबंध बसावा. परंतु बऊर ते उर्से टोलनाका दरम्यान पादचारी, गुरेढोरे, दुचाकीस्वार यांचा द्रुतगती मार्गावरील मुक्त वावर अद्याप थांबला नाही. त्यामुळे अपघात वाढतच आहेत.(वार्ताहर)

 

Web Title: 75 people killed in seven months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.