राज्यात ७.५ हजार हे. शेतीची झाली माती; सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 06:22 AM2024-04-14T06:22:30+5:302024-04-14T06:25:49+5:30
राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: सलग सहाव्या दिवशी शनिवारीही अवकाळी पावसाने झोडपून काढले. विदर्भात मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. सर्वाधिक चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या
जळगाव जिल्ह्याला झाल्याचा अंदाज आहे. रविवारीही विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ७ हजार ४८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान शनिवारी पहाटेही मराठवाडा, विदर्भासह जळगाव आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला.
सात राज्यांत गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा
- हवामान विभागाने जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा, राजस्थान व मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशातील १३ जिल्ह्यांत येत्या काही तासांत गारपिटीची शक्यता आहे.
- स्कायमेट या हवामान संस्थेने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
- तसेच उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा व अंदमान-निकोबारमध्ये पावसाची तर जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये हलक्या बर्फवृष्टीची शक्यताही वर्तविली आहे.
- इराण आणि पाकिस्तानमार्गे उत्तर भारतात पोहोचणाऱ्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामान बदलल्याने १५ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे.
कुठे किती नुकसान ?
जिल्हा हेक्टर
जळगाव ३,९८४
बीड १,०२०
नांदेड ७४८
वर्धा ५२७
धाराशिव ३०८
हिंगोली २९७
छ. संभाजीनगर १६३
लातूर १६०.२
जालना १३३.३