गुळाणी गावच्या सरपंचपदी ७५ वर्षांच्या आजी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:02 AM2019-02-26T00:02:19+5:302019-02-26T00:05:36+5:30
गुळाणी ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते व सरपंचपदासाठी २ उमेदवार होते.
वाफगाव : गुळाणी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीवर ७५ वर्षांच्या अंगठाबहादूर आजी सरपंच म्हणून विराजमान झाल्या आहेत. रविवारी (दि. २४) झालेल्या गुळाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. वयाच्या ७५ व्या वर्षी इंदूबाई हनुमंत ढेरंगे या सरपंच झाल्या.
गुळाणी ग्रामपंचायतीच्या ९ जागांसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते व सरपंचपदासाठी २ उमेदवार होते. सरळ सरळ दोन पॅनलमध्ये ही लढत झाली. यांमध्ये विद्यमान सरपंच दिलीपशेठ ढेरंगे यांच्या नेतृत्वाखाली श्री संत सटवाजीबाबा ग्रामविकास पॅनल कार्यरत होते. त्यांच्याविरोधात संत श्री सटवाजीबाबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या रुपाने उमेदवार उभे होते. संत श्री सटवाजीबाबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे नेतृत्व उद्योजक बांधकाम व्यावसायिक ज्ञानेश्वर ढेरंगे करीत होते.
संत श्री सटवाजीबाबा ग्रामविकासच्या सरपंचपदाच्या उमेदवार सरपंच कुंदा दिलीप ढेरंगे होत्या. कुंदा ढेरंगेदेखील याआधी सरपंच होत्या व सध्या त्यांचे पती दिलीप ढेरंगे सरपंच होते, तरीदेखील त्यांना पराभव पत्करावा लागला.
त्यांच्याविरोधात संत श्री सटवाजीबाबा ग्रामविकास परिवर्तनच्या सरपंचपदाच्या ७५ वर्षांच्या आजी उमेदवार इंदूबाई हनुमंत ढेरंगे होत्या. समोरील उमेदवारदेखील तुल्यबळ होता; परंतु शेवट गुळाणी गावातील नागरिकांनी आजींना सरपंच म्हणून विराजमान केले. कुंदा ढेरंगे यांना एकूण ६४६ मते पडली, तर इंदूबाई ढेरंगे यांनी ७६२ मते घेऊन त्या विजयी झाल्या. माझे वय ७५ वर्षे असले तरी मी गावाच्या विकासासाठी माझा संपूर्ण वेळ देणार आहे व गुळाणी गावाचा विकास करणार आहे, असे मत नवनिर्वाचित सरपंच इंदूबाई ढेरंगे यांनी मांडले आहे.