७५० जणांवर गुन्हा दाखल
By Admin | Published: October 8, 2014 05:29 AM2014-10-08T05:29:22+5:302014-10-08T05:29:22+5:30
‘रेल रोको’ आंदोलन करून दगडफेक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे व पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात सुमारे साडेसातशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरी : ‘रेल रोको’ आंदोलन करून दगडफेक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे व पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात सुमारे साडेसातशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांपैकी ११ जणांना अटक करून एक दिवसाची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.
सोमवारी दुपारी किरकोळ कारणावरुन पिंपरी रेल्वेस्थानकावर शेकडो नागरिकांनी बेकायदारीत्या एकत्रित येऊन ‘रेल रोको’ आंदोलन केले. यामुळे तब्बल तीन तास रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. दरम्यान, दगडफेकही केली. सरकारी मालमत्तेचे नुकसान करीत सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तसेच वातावरणात तणाव निर्माण झाला.
दरम्यान, समाजात चुकीचा संदेश पसरवून भावना भडकाविणे, बेकायदा जमाव जमविणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे या कलमांतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात सुमारे दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. जे. शेख यांनी दिली.
तर रेल्वे पोलीस ठाण्यात सुमारे सहाशे जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. दंगल करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे या कलमांतर्गत पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात सुमारे सहाशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अकरा जणांना अटक केली असून, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिली.