खळबळजनक बातमी! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात सापडला ७५० ग्रॅम गांजा
By नितीश गोवंडे | Published: May 27, 2024 02:30 PM2024-05-27T14:30:33+5:302024-05-27T14:32:23+5:30
आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच गांजा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...
पुणे : विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात मागील काही दिवसात ड्रग्ज संदर्भात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. ललित पाटील या ड्रग्ज तस्करामुळे शहरातील ड्रग्जची समस्या ऐरणीवर आली होती. त्यामुळे एकूणच सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातच गांजा सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याबाबत आता विविध संघटनांकडून कारवाईची मागणी पुढे येत आहे.
काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक ८ मध्ये सुमारे ७५० ग्रॅम गांजा सापडला होता. विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करत असून कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात युवा सेनेने निवेदन प्रसिद्ध करून येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ही घटना १४ मे रोजी उघडकीस आली. एवढा गंभीर प्रकार घडूनही पुणे विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. या घटनेला १० दिवस लोटल्यानंतरही काहीच ठोस कृती विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली नाही. केवळ या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठाची प्रतिमा खराब होणे ही लज्जास्पद बाब आहे त्यामुळे या प्रकरणात विद्यापीठाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.