कुकडीत ७६ टक्के पाणीसाठा
By admin | Published: August 26, 2014 05:06 AM2014-08-26T05:06:57+5:302014-08-26T05:06:57+5:30
जुन्नर, आंबेगाव, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा, पारनेर आदी तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पात आज रोजी ७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
येडगाव : जुन्नर, आंबेगाव, कर्जत, श्रीगोंदा, करमाळा, पारनेर आदी तालुक्यांना वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पात आज रोजी ७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी प्रकल्पातील धरण परिसरात अद्यापही पावसाचा ओघ कायम आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढत होत असली, तरी मागील वर्षीपेक्षा आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात ११ टक्के पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी कुकडी प्रकल्पात आजच्या तारखेला ८७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
येडगाव धरणातून कुकडी डाव्या कालव्यास ३० जुलै पासून १३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आल्यामुळे येडगाव धरणाची पाणी कमी होत आहे; तर इतर धरणांमधील पाणीपातळीत वाढ होत आहे. कुकडी प्रकल्पात आज अखेर पावसामुळे साडे बत्तीस टीएमसी नवीन पाणी आले असून, त्या-त्या धरणाची पूरपरिस्थिती लक्षात घेऊन धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.
मागील वर्षी आजच्या तारखेला कुकडी प्रकल्पात २६५५० दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता, तो टक्केवारीमध्ये ८७ टक्के इतका होता. यावरून या वर्षी आजच्या तारखेला मागील वर्षीपेक्षा आज ११ टक्के इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
वडज धरणातून नदीला २०० क्युसेक्सने, तर कालव्याला २५४ क्युसेक्सने, पिंपळगाव जोगे धरणातून नदीस १५० क्युसेक्स, डिंंभा धरणातून डाव्या कालव्यास ५०० क्युसेक्स, उजव्या कालव्यास १५० क्युसेक्स व येडगाव धरणातून डाव्या कालव्यास १३०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले असून, चिल्हेवाडी धरणातूनदेखील येडगाव धरणात ८०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. (वार्ताहर)