७६ वर्षांच्या सरपंच आजी करणार गावाचा कारभार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:28 AM2019-03-08T01:28:14+5:302019-03-08T01:28:28+5:30
अवघं तीन हजार लोकसंख्येचं गुळाणी गाव ! खेडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव सध्या सरपंच आजींमुळे चर्चेत आहे.
पुणे : अवघं तीन हजार लोकसंख्येचं गुळाणी गाव ! खेडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव सध्या सरपंच आजींमुळे चर्चेत आहे. ७६ वर्षांच्या इंदूबाई हनुमंत ढेरंगे या गावच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच म्हणून गावगाडा हाकणार आहेत. आश्चर्य म्हणजे त्या पूर्ण अशिक्षित असल्या तरी गावात काय बदल करायचे आहेत, याबद्दल त्या जराही साशंक नाहीत. त्यामुळे वयासोबत मिळालेल्या सरपंचकीचा वापर करून त्या गुळाणीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
इंदूबाई संपूर्ण गावात ‘नानी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. गावापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकळवाडीतील वाळुंज कुटुंब हे त्यांचे माहेर. आयुष्याचा सर्व काळ त्यांनी याच परिसरात घालवला आहे. त्यामुळे या भागातल्या गरजा आणि अडचणी त्यांना चांगल्याच माहिती आहेत. त्याच सोडवण्यासाठी आलेली संधी सोडायची नाही, असा निश्चय त्यांनी केला आणि सरपंचपदाची निवडणूक लढवली. त्याची कहाणी अशी, की सरपंचपदासाठी महिला राखीव आरक्षण पडले आणि उमेदवाराचा शोध सुरू झाला. शेतीत रमलेल्या गावच्या महिला ग्रामपंचायतीत येऊन कारभार करायला पुढे येईना. सुरुवातीला आजी नव्हे तर त्यांच्या सूनबाई निवडणूक लढवणार होत्या. पण मतदार यादीतून नाव वगळले गेल्याने त्यांचा पत्ता कट झाला आणि निवडणूक लढवण्याची संधी त्यांच्याकडे चालत आली. लांब पसरलेल्या वस्त्या आणि शेतामध्ये असलेल्या प्रत्येक घरात जाणे त्यांना जमले नाही. त्यामुळे त्यांच्या सुना, मुले प्रचार करीत होती. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले; पण त्यालाही खंबीरपणे तोंड देत आजी सरपंच झाल्या. घराबाहेर गुलाल उधळला, घोषणा झाल्या आणि आयुष्यातला सर्वांत आनंदाचा दिवस उगवल्याची जाणीव त्यांना झाली.
‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘आता गावासाठी रस्ते करायची इच्छा आहे. गावच्या आयाबायांची पाण्याची वणवण थांबवायची आहे. पाणी नसल्याने वर्षातून दोन पिकं घेता येतात. त्यामुळे पाईपलाईनने पाणी आणायचं आहे. त्यासाठी मी राजकारण करेन आणि इतकं चांगलं काम करेन, की कोणाच्याही लेकी-सुना पुन्हा सरपंच व्हायला नाही म्हणणार नाहीत.’’