वाहतूक नियमभंग करणाऱ्या ७७ टक्के पुणेकरांनी थकवला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:14 AM2021-02-16T04:14:02+5:302021-02-16T04:14:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहराची साधारण लोकसंख्या ४० लाख असून पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षी वाहतूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराची साधारण लोकसंख्या ४० लाख असून पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षी वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी तब्बल २० लाख ९३ हजार ९४७ केसेस केल्या आहेत. याचा अर्थ सरासरी निम्म्या पुणेकरांवर वाहतूक नियमभंगाचा एक तरी गुन्हा दाखल झाला आहे. वाहतूक पोलिसांनी तब्बल ८० कोटी ४७ लाख ८४ हजार ४५३ रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. त्यापैकी ७७ टक्के पुणेकरांनी दंड भरलेला नाही. या दंडवसुलीसाठी आता वाहतूक विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या कारवाईमध्ये सर्वाधिक विनाहेल्मेट कारवाई झाली असून जवळपास निम्म्या म्हणजे १० लाख ८० हजार ९०२ केसेस या विना हेल्मेटच्या झाल्या आहेत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईपैकी केवळ ६ लाख ४० हजार ४८८ केसेसमध्ये १८ कोटी ७२ लाख ६२ हजार ७५३ रुपयांची दंडवसुली झाली आहे. तर १४ लाख ५३ हजार ४५५ केसेसची ६१ कोटी ७५ लाख २१ हजार ७०० रुपयांचा दंड थकीत आहे.
कोरोनाकाळात संचारबंदी असल्याने काही महिने सीसीटीव्हीमार्फत कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे कारवाई कमी झाली आहे. कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी दंडवसुलीसाठी सक्ती करण्यात येत नव्हती. तसेच दंडाची रक्कम रोख स्वीकारणे बंद केले होते. त्यामुळे दंडवसुली कमी झाली.
विनाहेल्मेटच्या खालोखाल झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, मोबाईलवर बोलणे, ट्रीपलसीट याच्या कारवाया अधिक आहे.
---
वाहतूक नियमभंगाची थकीत दंडाची वसुली करण्यासाठी दुपारी ३ ते ५ या दरम्यान विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात येत असून १ नोव्हेंबर ते २८ जानेवारी दरम्यान ८ कोटी ५२ लाखांची वसुली करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी रस्ता सुरक्षा अभियानात विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
- राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
वाहतूक नियमभंगाच्या कारवाया
एकूण केसेस - २०९३९४७
एकूण दंड रक्कम - ८०४७८४४५३
एकूण पेड केसेस - ६४०४८८
एकूण पेड दंड रक्कम - १८७२६२७५३
एकूण थकीत केसेस - १४३४५९
एकूण थकीत दंड रक्कम - ६१७५२१७००