भाडेतत्त्वावर घेतलेल्या ७७ कारचा वापर दारूच्या वाहतुकीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:14 AM2021-08-26T04:14:57+5:302021-08-26T04:14:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सरकारी अधिकाऱ्यांच्या वापरासाठी कार हवी, असे सांगून भाडेतत्त्वावर घेतलेल्या ७७ कारचा वापर दारू वाहतुकीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सरकारी अधिकाऱ्यांच्या वापरासाठी कार हवी, असे सांगून भाडेतत्त्वावर घेतलेल्या ७७ कारचा वापर दारू वाहतुकीसाठी केला जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. येरवडा पोलिसांनी राज्याच्या विविध भागांतून या ७७ कारपैकी ४६ कार जप्त केल्या आहेत.
याबाबत टूर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स व्यावसायिक श्रीधर जगताप यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली. या गुन्ह्यात अयान ऊर्फ अन्थोनी पॉल छेत्तीयार (वय ३८, रा. मुंबई) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादींकडून २४ जूनला इनोव्हा कार भाड्याने घेतली. सरकारी अधिकाऱ्याला गाडी भाड्याने द्यायची आहे, असे त्या वेळी त्यांनी फिर्यादी यांना सांगितले. मात्र गाडीचा वापर दारूच्या वाहतुकीसाठी करण्यात आला. तसेच भाडे आणि गाडी परत करण्यात आली नाही. त्यामुळे तक्रार दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या छेत्तीयार याने जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला.
या गुन्ह्यातील आरोपींकडून तब्बल ४६ कार जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर नेरूळ आणि ओशिवारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. आरोपींचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यास तो पुन्हा अशा प्रकारचे गुन्हा करण्याची, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची अथवा परागंदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी ॲड. पाठक यांनी केली.
ते ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. आगरवाल यांनी अयान ऊर्फ राहुल ऊर्फ अन्थोनी पॉल छेत्तीयार याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
–