पुण्यातील ७७ वर्षीय जादुगाराची कमाल; आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बक्षीस मिळवून केली धमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 06:11 PM2021-08-19T18:11:51+5:302021-08-19T18:12:15+5:30
आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवल्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.
पुणे : इंटरनॅशनल ब्रदरहूट ऑफ मॅजिशियन्स, अमेरिका यांच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतराराष्ट्रीय जादूगारांच्या स्पर्धेत पुण्यातील ज्येष्ठ जादूगार चंद्रशेखर चौधरी यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. ७७ वर्षीय तरुणाने हे आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवल्याने भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.
या स्पर्धेत श्रीलंका, फिलीपाईस, बांगलादेश, मोरोक्को, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, ब्राझील, मेक्सिको, तुर्कस्तान, रुमानिया, अल्जेरीया, अमेरिका, अझरबेझान व भारतासह २०० नामांकित जादूगारांनी भाग घेतला होता. अमेरिकन जादूगार जिओव्हनी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दुसरा क्रमांक विभागून पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार चंद्रशेखर चौधरी यांनी मिळवला.
चंद्रशेखर चौधरी यांचे नूतन मराठी विद्यालय प्रशालेमधून शिक्षण झाले आहे. शालेय वयातच त्यांनी जादुचे प्रयोग शिकण्यास प्रारंभ केला. १९६१ पासून जादुचे प्रयोग सादर करण्यास सुरवात केली. स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्यांनी देश विदेशात अनेक प्रयोग केले. आजवर त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. त्यात जादूगार कोशिकदादा पुरस्कार मिळाला होता. (जादूगार के. लाल ज्युनियर तर्फे ) मुंबईच्या असोसिएशन ओफ इल्युजनिस्ट आणि मॅजिशियन्स तर्फे २०१७ साली एक्सलन्स ऑफ गॅलॅक्सी डायमंड अवॉर्ड होते.
२०१८ साली कोलकाता येथील फेडरेशन ऑफ इंडियन मॅजिशियन असोसिएटने (फिमा) पश्चिम भारताचे संचालक म्हणून नियुक्त केले. त्याचवेळी इंडियन ब्रदरहूड ऑफ मॅजिशियन्स, नवी दिल्ली येथे जादू शिरोमणी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. २०१९ साली केरळ येथील कोलम मॅजिशियन्स असोसिएशनतर्फे के एम ए इंद्रजाल पुरस्काराने गौरवण्यात आले होते. इंडियन मॅजिक हॉबी असोसिएशन, तामिळनाडूने तहहयात आश्रयदाते म्हणून नेमणूक केली. जादु व्यतिरिक्त चंद्रशेखर चौधरी हे इलेक्ट्रिक व ओटोमोबाईल दिव्यांचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. त्या क्षेत्रात त्यांचा ६० वर्षाचा अनुभव असुन जगातील सर्वात मोठा दिव्यांचा संग्रह त्याच्याकडे आहे.