पावसानंतर कुकडीत ७.७६ टक्केच साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 02:52 AM2018-06-12T02:52:51+5:302018-06-12T02:52:51+5:30
जुन्नर तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होऊनदेखील त्याचा लाभ धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेला नाही. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये ७.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
नारायणगाव - जुन्नर तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होऊनदेखील त्याचा लाभ धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेला नाही. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये ७.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रथमच या धरणांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत ५.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
जुन्नर तालुक्यात १ जूनपासून अनेक वेळा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे सर्व धरणांच्या पाणलोटक्षेत्रात पाणी येईल, असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाचे पाणी आलेले नाही. जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज आणि आंबेगाव तालुक्यातील डिंभा या चार धरणांमध्ये २०३४ दलघफु (७.७६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजअखेर अवघे ७३५ दलघफु (२.४१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. प्रथमच जूनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. सध्या येडगाव धरणात ९१९ दलघफु (३३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणात पिंपळगाव जोगातील मृतसाठा असलेले पाणी १२०० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. तसेच डिंभा डावा कालव्याद्वारे ६०० क्युसेक्स वेगाने येडगाव धरणात विसर्ग सुरू आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून ७५ मिमी पाऊस झालेला आहे. माणिकडोह धरणात ५१७ दलघफु (०.५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ११ मिमी पाऊस झालेला आहे. वडज धरणात ११३ दलघफु (९.६४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून ७३ मिमी पाऊस झालेला आहे.
डिंभा धरणात ७९५ दलघफु (६.३६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून
७९ मिमी पाऊस झालेला आहे.
पिंपळगाव जोगा धरणात उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नसून या धरणातून १२०० क्युसेक्स वेगाने येडगाव धरणात विसर्ग सुरू आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर व शाखा अभियंता
घळगे यांनी दिली.