राज्यात ७८ टक्के पेरण्या पूर्ण; सोयाबीन, कपाशी १०० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 06:25 AM2023-07-22T06:25:22+5:302023-07-22T06:25:53+5:30
खरीपाचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून, १ कोटी ११ लाख ४८ हजार ४५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या चार दिवसांपासून राज्यात सर्वत्र होत असलेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्या मार्गी लागल्या असून, आतापर्यंत १ कोटी ११ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत ७८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीनची गेल्या वर्षाच्या तुलनेत १०४ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. कपाशीचीही लागवड ३९ लाख ५९ हजार हेक्टरवर अर्थात १०० टक्के झाली आहे.
खरीपाचे सरासरी क्षेत्र १४२.०२ लाख हेक्टर असून, १ कोटी ११ लाख ४८ हजार ४५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुगाची पेरणी ३५ टक्केच म्हणजे १ लाख ३८ हजार ४९९ हेक्टरवर झाली आहे. उडीद पिकाची १ लाख ६० हजार ४३८ हेक्टरवर पेरणी झाली असून, ती सरासरी क्षेत्राच्या ४३ टक्के आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २४ जुलैपर्यंत राज्यात पाऊस राहील. त्यानंतर उर्वरित पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.
तब्बल ४३ लाख हेक्टरवर सोयाबीन
n राज्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनखाली असून, सरासरी ४१ लाख ४९ हजार ९१२ हेक्टरवर पेरणी केली जाते. गेल्यावर्षी ४३ लाख २० हजार २७७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र, १०० टक्के अर्थात ४३ लाख ४ हजार १७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
n कपाशीची आतापर्यंत ३९
लाख ५९ हजार १६१ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हेच क्षेत्र ३९ लाख ७८ हजार ५६६ हेक्टर इतके होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत १००
टक्के क्षेत्रावर पेरणी झाली
आहे.
भात लागवडीला वेग
राज्यात कोकण, तसेच घाट परिसरातील पुणे, नाशिक, कोल्हापूर व पूर्व विदर्भात चांगला पाऊस झाल्याने भाताच्या पुनर्लागवडीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. राज्यात भाताचे सरासरी पेरणी क्षेत्र १५ लाख ८ हजार ३७४ हेक्टर असून, आतापर्यंत ५ लाख १७ हजार ४१ हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या ही लागवड ३४ टक्के, तर गेल्यावर्षीच्या तुलनेत ८३ टक्के आहे.
सांगली, कोल्हापुरात सर्वांत कमी पाऊस
कोकण विभागात सरासरीच्या ९०.६ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल नागपूर ८८.५ टक्के, पुणे ४३.३, नाशिक ६७.६, अमरावती ७४.५, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ७१.२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वांत कमी पाऊस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात ३७ टक्के, तर सर्वाधिक पालघरमध्ये १२६ टक्के झाला आहे.