SSC Result: दहावीत राज्यातील ७८ टक्के विद्यार्थी 'First Class'; यंदाही मुलींनीच मारली बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 05:40 PM2022-06-17T17:40:48+5:302022-06-17T17:40:56+5:30
राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला असून विशेष म्हणजे ७८ टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. राज्याचा निकाल ९६.९४ टक्के लागला असून विशेष म्हणजे ७८ टक्के विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये म्हणजे ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. काेकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.२७ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी राज्याचा निकाल ३.१ टक्क्यांनी घटला आहे. यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींची निकालाची टक्केवारी १.९० ने वाढलेली आहे.
दहावी परीक्षेस बसलेल्या १५ लाख ६८ हजार ९७७ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५० हजार ७७९ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यांची टक्केवारी ४१.४७ टक्के आहे. ५ लाख ७० हजार २७ विद्यार्थ्यांना ६० ते ७५ टक्के गुण मिळाले आहेत. त्यांची टक्केवारी ३६.२७ टक्के इतकी आहे. याचा अर्थ ६० टक्के म्हणजे प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी ७७.७१ टक्के आहेत. २,५८,०२७ म्हणजे १६.४४ टक्के विद्यार्थ्यांना ४५ ते ६० टक्के गुण मिळाले आहेत. ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळविलेले विद्यार्थी केवळ ४२,१७० असून त्यांची टक्केवारी २.६८ टक्के आहे.
राज्यात काेकण विभाग अव्वल तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ९५.९० टक्के इतका आहे. पुणे विभाग ९६.९६ टक्के मिळवत पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यात दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे. परीक्षेला ८ हजार २९ विद्याथी बसले हाेते. त्यापैकी ७ हजार ५७९ दिव्यांग विद्याथी उत्तीर्ण झाले. एकूण ५९ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर १२२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.