प्रवेशासाठी ७८ हजार विद्यार्थी पात्र
By admin | Published: June 30, 2017 04:03 AM2017-06-30T04:03:55+5:302017-06-30T04:03:55+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यलायातील अकरावी प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यलायातील अकरावी प्रवेशासाठी गुरुवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत ७८ हजार २१८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरून पूर्ण केला आहे. त्यामुळे केवळ आॅनलाईन अर्ज भरलेल्या या विद्यार्थ्यांनाच प्रवेश फेऱ्यांमधून प्रवेश दिले जातील. तसेच, आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देणाऱ्या संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात
येईल.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश
प्रक्रिया राबविली जात आहे. यंदा अकरावीची प्रवेश क्षमता वाढली असून, तब्बल ९४ हजार जागांसाठी केवळ ७८ हजार २१८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत लिंक सुरू ठेवली जाणार असल्याने त्यात सुमारे १५० ते २०० विद्यार्थी वाढण्याची शक्यता आहे. आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती राज्य मंडळाला कळवली जाणार आहे. त्यामुळे आॅफलाईन पद्धतीने प्रवेश घणाऱ्या विद्यार्थ्याला बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट होता येणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसारच प्रवेश दिला जाईल, असे सहायक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले.
राऊत म्हणाल्या, ‘‘आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार येत्या ३० जून ते ३ जुलै या कालावधीत कोट्यातील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे आवश्यकआहे. तसेच, येत्या ४ जुलै रोजी प्रवेश अर्ज पूर्ण भरून सबमीट केलेल्या विद्यार्थ्यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर विद्यार्थ्यांच्या हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. ७ जुलै रोजी हरकतींच्या दुरुस्तीसह यादी प्रसिद्ध केली जाईल.
पहिली गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी ७ जुलै ते ९ जुलैपर्यंत कालावधी दिला जाईल. त्यानंतर
१० जुलै रोजी पहिली गुणवत्ता
यादी प्रसिद्ध केली जाईल.
अकरावी प्रवेशासाठी चार फेऱ्या घेतल्या जाणार आहेत.