नाेकरीच्या परीक्षेत राज्यातील 7,800 गुरुजी पैसे देऊन पास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 10:17 AM2022-01-29T10:17:57+5:302022-01-29T10:18:06+5:30
अपात्र टीईटी उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची हाेणार तपासणी
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी - २०२०) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात ७ हजार ८०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवत त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण विभाग तसेच राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असून, या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होऊ शकते, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. याप्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजिस कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालिन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह ३० ते ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सन २०१९ - २०२०मध्ये राज्यातील १६ हजार ७०५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. ओएमआर शीट तपासणीत ७ हजार ८०० अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. ज्या अपात्र उमेदवारांची गुणवाढ करण्यात आली. अशा उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
अशी ठरली पात्रता
२०१९-२० च्या टीईटी परीक्षेतील पहिल्या पेपरला १ लाख ८८ हजार ६८८ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील १० हजार ४८७ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. तर, पेपर २ साठी १ लाख ५४ हजार ५९६ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६,१०५ जणांना पात्र ठरले होते.