जुन्नर, चाकण नगरपरिषदेसाठी ७९ कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:16 AM2021-02-06T04:16:58+5:302021-02-06T04:16:58+5:30
जुन्नर : जिल्ह्यातील महत्त्वाच्या चाकण नगर परिषदेसाठी ६५ कोटी तर जुन्नर नगरपरिषदेसाठी १४ कोटींच्या पाणी योजनांना राज्याचे नगरविकास व ...
जुन्नर : जिल्ह्यातील महत्त्वाच्या चाकण नगर परिषदेसाठी ६५ कोटी तर जुन्नर नगरपरिषदेसाठी १४ कोटींच्या पाणी योजनांना राज्याचे नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याची माहिती शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी दिली.
आढळराव पाटील म्हणाले की, चाकण व जुन्नर या दोन महत्त्वपूर्ण शहरांची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेऊन गेली तीन-चार वर्षांपासून या ठिकाणी पाणी योजनांना मंजुरी मिळावी याकरिता मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तसेच मंत्रालयातील नगरविकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. चाकण शहराला ६१ हजार लोकसंख्येचा विचार करून प्रतिमाणसी दररोज १३५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा होऊ शकेल. यादृष्टीने ६५.१४ कोटींचे अंदाजपत्रक करण्यात आले. भामा आसखेड धरणातून २.१८६ दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्यासाठी एप्रिल २०१९ मध्ये परवानगी घेण्यात आली होती. या कामासाठी स्व. माजी आमदार सुरेश गोरे व मी सातत्याने पाठपुरावा केला.
जुन्नर शहरासाठी माणिकडोह जलाशयातून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजना राबविणे याकामी सुमारे १४ कोटी रकमेचा प्रस्ताव तयार करून मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. माणिकडोह जलाशयातून पाणी उचलण्याकरिता मंजुरी घेण्यात आली. या कामांना तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर राज्याचे नगरविकास बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात दोन्ही नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेऊन अंतिम मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू होता.
३ फेब्रुवारी रोजी यासंदर्भात मंत्रालयामध्ये नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन शिवसेनेची सत्ता असलेल्या दोन्ही नगर परिषदेतील महत्त्वपूर्ण पाणी योजनांना मंजुरी मिळाली आहे. या योजनांना मंजुरी मिळावी यासाठी स्व. माजी आमदार सुरेश गोरे, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, चाकण व जुन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचे शिवसेना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रयत्न केले.
०४ जुन्नर
नगरविकास व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे समवेत चर्चा करताना शिवसेना उपनेते, शिवाजीराव आढळराव पाटील.