बाप्पाची कृपा अन् पाेलिसांच्या प्रयत्नांनी मिळाले ७९ लाख; ज्येष्ठ व्यावसायिकाची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 09:54 AM2023-07-14T09:54:36+5:302023-07-14T09:55:03+5:30
ज्येष्ठाची घरफोडी होऊन त्यात डायमंड, सोन्याचांदीचे दागिने असा ९५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता
पुणे : गणपतीचा मी निस्सीम भक्त आहे. आपण चांगले काम केलेले असल्याने आपले कोणी काही वाकडे करणार नाही, असा विश्वास बाळगून होतो. अखेर बाप्पाच्या कृपेने आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी चोरीला गेलेले दागिने परत मिळाले, अशी भावना ज्येष्ठ व्यावसायिक जयंत इनामदार यांनी सांगितले. त्यांचे चोरीला गेलेले ७९ लाख ८४ हजार ४८० रुपयांचे दागिने गुरुवारी परत मिळाल्यानंतर ते बाेलत हाेते.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते जयंत इनामदार यांचे चोरीला गेलेले दागिने परत देण्यात आले. यावेळी उपायुक्त सुहेल शर्मा, अलंकार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेश तटकरे, संगीता पाटील उपस्थित होते. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी संगीता पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
जयंत इनामदार (वय ७०, रा. मुनिज बंगला, कर्वेनगर) यांचा बंगला बंद असताना २७ ऑक्टोबर २०२२ रोजी घरफोडी होऊन त्यात डायमंड, सोन्याचांदीचे दागिने असा ९५ लाख १५ हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्यात तपास करताना पोलिस अंमलदार धीरज पवार, सागर केकाण, नितीन राऊत यांना एक पुरुष व एक महिला संशयास्पदरीत्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. त्यावरून त्यांनी राजू दुर्योधन काळमेघ (वय ४५, रा. पर्ल सोसायटी, क्रांतीनगर, वडगाव) याला अटक केली. वाकड येथून सोनिया श्रीराम पाटील (वय ३२) ही सर्व माल घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी तिला पकडले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी हे दागिने परत करण्यात आले. जयंत इनामदार हे आरसीसी कन्सल्टंट आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराचे काम त्यांनी केले. तसेच दत्तमंदिराचे काम त्यांनी केले.
इनामदार यांनी सांगितले की, पोलिसांनी अतिशय चिकाटीने तपास केला. एका सीसीटीव्हीमध्ये या चोरट्याची अर्धवट पँट दिसली होती. त्यावरून परिसरातील सर्व कॅमेऱ्यांची पडताळणी करून त्यांनी पाच दिवसांत आरोपींना पकडले. पोलिसांनी अतिशय मेहनत घेऊन या गुन्ह्याचा शोध लागला. त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे