Zp School: पुण्यातील शाळा अंधारात; तब्बल ७९२ शाळांचे वीज कनेक्शन तोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 01:32 PM2021-11-16T13:32:18+5:302021-11-16T14:34:32+5:30
पुणे जिल्ह्यात एकूण ३ हजार ६३९ जिल्हा परिषद शाळा आहेत
पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास दोन वर्ष बंद असलेल्या शाळा हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र पुण्यात तब्बल ७९२ शाळांना (zp school) अंधाराचा सामना करावा लागणार आहे. या शाळांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील या शाळा आहेत. वीजबिल न भरल्यामुळे शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वीज बिल न भरल्यामुळे पुणे जिल्ह्यातील ७९२ शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. या सर्वच्या सर्व शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत.
पुणे जिल्ह्यात एकूण ३ हजार ६३९ जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी २८४७ शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. तर इतर शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
तब्बल १२८ शाळांचे मीटर काढले
वीज बिल न भरल्यामुळे ७९२ शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे तर १२८ शाळांचे मीटरचं वीज वितरणने काढून टाकले आहेत. या घटनेमुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील ४०२ शाळा
सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील भोर, वेल्हा, मुळशी, बारामती, दौंड आणि इंदापूर या तालुक्यातील सुमारे ४०२ शाळांचा यामध्ये समावेश आहे.
''प्रत्येक ग्रामपंचायतला जिल्हा परिषदेकडून आदेश देण्यात आले आहेत, की ग्राम निधीतून थकीत वीज बिले भरावीत. असे पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतारे यांनी सांगितले आहे.''