पुणे जिल्ह्यातील नारायण गावात ८ बांग्लादेशी दहशतवाद विरोधी पथकाच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 09:18 PM2023-12-14T21:18:37+5:302023-12-14T21:18:46+5:30
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये केले होते मतदान
पुणे: दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिल्ह्यातील नारायणगावात ८ बांग्लादेशी नागरिकांना पकडले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी या बांगला देशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायणगावात बांगला देशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार एटीएसचे पथक गुरुवारी सकाळीच नारायणगावात धडकले. या पथकाने ८ बांगला देशी नागरिकांना ताब्यात घेले आहे. हे सर्व जण बेकायदेशीरपणे भारतात रहात असल्याचे आढळून आले आहे.
इसीसचे पुणे मॉड्युल समोर आल्यानंतर नुकतेच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यांनी एकत्रित कारवाई करुन इसीसच्या १५ जणांना पकडले होते. पुण्यातही दोघांची चौकशी केली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने देखील यापुर्वी बुधवार पेठेत कारवाई करत तेथे वास्तव्या करणार्या बांग्लादेशी महिला आणि पुरुषांवर कारवाई करत त्यांना पकडले होते.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये केले होते मतदान
नारायणगावात मोठ्या संख्येने बांग्लादेशी रहात असल्याचा तेथील गावकर्यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या बांग्लादेशींनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानही केल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाच्या योजनेनुसार या बांग्लादेशींची मजूर म्हणून नोंदणी केली गेली. त्यावरुन त्यांना ग्रामपंचायतीने रहिवासी दाखला दिला गेला. त्याच्या सहाय्याने त्यांची नावे मतदार यादीत घुसडण्यात आली. त्याबरोबर त्यांना पॅन कार्डही काढून देण्यात आले. त्याच्या सहाय्याने त्यांनी आधार कार्ड काढली आहे. ते मुळचे बांगला देशाचे असले तरी ते प. बंगालमधील असल्याचे सांगतात. भारत बांगला सीमेवरील गावातून एजंटमार्फत बनावट दाखले मिळवितात. त्याआधारे त्यांनी नारायणगावात बस्थान बसविले आहे.