बेशिस्तांकडून आठ कोटींची दंडवसुली
By admin | Published: November 18, 2014 03:31 AM2014-11-18T03:31:45+5:302014-11-18T03:31:45+5:30
शिक्षणाचे माहेरघर, चळवळींचे उगमस्थान आणि आयटी पुणे अशी ओळख असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडलेली आहे.
लक्ष्मण मोरे, पुणे
शिक्षणाचे माहेरघर, चळवळींचे उगमस्थान आणि आयटी पुणे अशी ओळख असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडलेली आहे. चार वर्षांपासून आठ कोटींपेक्षा अधिक रकमेच्या वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला असून, गेल्या १० महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये तब्बल ८ कोटी ९ लाख ६५ हजार ८७८ रुपयांचा दंड वसूल केला आहे.सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेले पुणे शहर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत वाहतूक नियमभंगामध्येही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ असे अभिमानाने सांगणाऱ्या पुणेकरांकडून वाहतूक नियमभंगासाठी डिसेंबर अखेरपर्यंत १० कोटींचा दंड वसूल होण्याची शक्यता आहे.
जानेवारी ते आॅक्टोबर या १० महिन्यांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ८५ प्रकारच्या विविध कारवाया केलेल्या आहेत. यांमध्ये किरकोळ आणि सहज टाळता येण्याजोग्या चुका वाहनचालकांकडून होतात. किरकोळ स्वरूपाचे वाहतुकीचे नियमही पाळण्यात वाहनचालकांची मोठी उदासीनता कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एरवी टाळता येण्याजोग्या सिग्नल तोडणे, नो एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन लावणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, मोबाईलवर बोलणे, काळ्या काचा लावणे, कागदपत्र जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे अथवा चालविणे यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट, लेन कटिंग वाहनांना रिफ्लेक्टर न लावणे, रहदारीला अडथळा करणे अशा टाळता येण्याजोग्या चुका वाहनचालक करतात.
किरकोळ स्वरूपाच्या वाटणाऱ्या चुका केवळ दंड भरण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. स्वत:बरोबरच इतरांच्याही जीविताला त्यामुळे धोका निर्माण होतो. अपघातांचे गांभीर्य कमी झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेदरकारपणा येऊ लागला आहे. विशेषत: दुचाकी आणि मोटारसायकल चालकांमध्ये हे प्रमाण अधिक पाहायला मिळते. रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रियांच्या बाबतीतही ही संवेदनशीलता दिसत नाही. वेडीवाकडी वाहने चालविणे, मध्येच वाहन घालणे, रस्त्यावर वेडीवाकडी वाहने उभी करणे, दोन वाहनांमधून मार्ग काढत जाणे, लेन शिस्त न पाळणे अशा अनेक कारणांमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.
शहरात महत्त्वाच्या रस्त्यांवर, चिंचोळ्या आणि अरुंद रस्त्यांवरचे बेकायदा पार्किंग, व्यावसायिकांनी खाऊन टाकलेले इमारतींचे पार्किंग यामुळे रस्त्यांवरच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. वाहतुकीचे नियम वाहनचालकांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आहेत,
याचा विसर वाहनचालकांना पडलेला आहे. केवळ वाहन चालविता आले म्हणजे झाले, असे नसून वाहतूक साक्षरता येणेही तेवढेच आवश्यक आहे.