पालघरमध्ये एकाच महिन्यात भूकंपाचे ८ धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 10:26 PM2018-12-10T22:26:05+5:302018-12-10T22:26:41+5:30
भूगर्भातील हालचालीमुळे गेल्या एका महिन्यात पालघरमध्ये तब्बल ८ वेळा भूकंप जाणवला असून या भागात अशा प्रकारच्या हालचाली जाणवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे वेधशाळेत या भूकंपाच्या नोंदी झाल्या आहेत.
पुणे : भूगर्भातील हालचालीमुळे गेल्या एका महिन्यात पालघरमध्ये तब्बल ८ वेळा भूकंप जाणवला असून या भागात अशा प्रकारच्या हालचाली जाणवण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुणे वेधशाळेत या भूकंपाच्या नोंदी झाल्या आहेत.
गेल्या महिन्यात १० नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्याची रेश्टर स्केलवर त्यांची ३.२ इतकी नोंद झाली होती. त्यानंतर आजपर्यंत पालघरला एकूण ८ धक्के जाणवले. ते साधारण २.७ ते ३.३ रेश्टर स्केल इतक्याच्या तीव्रतेचे होते. या भूकंपाचा केंद्रबिंदु डहाणू तालुक्यात असून ते जमिनीपासून सुमारे १० ते १३ किलोमीटर इतक्या खोलीवर आहे. पालघर हा भूकंप प्रवण क्षेत्र ३ मध्ये येत असला तरी या भागात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भुकंपाचे धक्के जाणवू लागले आहेत.
याबाबत पुणे वेधशाळेतील भूकंप मापन केंद्राचे सहायक वैज्ञानिक धर्मपाल यांनी सांगितले की, इंडो आॅस्टेलियन प्लेटमध्ये होणा-या हालचालीमुळे असे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. हिमालयीन पर्वत रांगांमध्ये अशा प्रकारचे धक्के नेहमी जाणवतात. भूकंपाचे वर्गीकरण त्याच्या तीव्रतेवर करण्यात आले आहे. फेव्हर, सास्टेल, मॉडरेट, ग्रेट आणि बेरी ग्रेट अशा पाच प्रकारात वर्गीकरण केले जाते़ पालघरमध्ये जाणवणारे धक्के हे २़२ ते ४़९ रेक्टर स्केलमध्ये दुस-या प्रकारात मोडतात. पुणे वेधशाळेत वर्ल्डवाइल्ड सिसोग्राफ नेटवर्क उपकरण बसविण्यात आले आहे. देशातील ४ प्रमुख स्टेशनपैकी पुणे हे एक स्टेशन आहे.
कुर्डवाडी येथूनही एक फ्लॉटलाईन जाते. त्यातील हालचालीमुळे परभणी, हिंगोली परिसरात भुकंपाचे धक्के जाणवत आहेत.
भुकंपाचे अनुमान अजूनपर्यंत तरी कोणी देऊ शकत नाही. जगात भूकंपाचा पूर्वअनुमान जाणून देणारी कोणतीही यंत्रणा अजून विकसित झालेली नाही, असे धर्मपाल यांनी सांगितले.
पालघरमधील भूकंप
दिनांक वेळ तीव्रता
११ नोव्हेंबर १८.२५ ३.२
२४ नोव्हेंबर १५.१५ ३.३
२ डिसेंबर १.३८ ३.१
२ डिसेंबर १.४८ २.९
४ डिसेंबर २१.२४ ३.२
७ डिसेंबर २२.१८ २.९
१० डिसेंबर ९.०४ २.८
१० डिसेंबर ९.०४ २.७