पुण्यात एकाच दिवसात ८ गुंडांना केले तडीपार; पुणे पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 03:40 PM2022-06-06T15:40:04+5:302022-06-06T15:45:01+5:30
पुणे पोलिसांची मोठी कारवाई...
पुणे : चंदननगर, येरवडा, लोणीकंद, विमानतळ परिसरात दहशत पसरविणाऱ्या ८ गुंडांना पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी एक ते दोन वर्षांसाठी तडीपार केले.
वाघोली, केसनंद विमाननगर परिसरात दहशत पसरविणारे सत्यवान ऊर्फ अप्पा श्रीमंत घाडगे ऊर्फ गाडगे (वय २४, रा. वाघेश्वरनगर, वाघोली) आणि आकाश अशोक राठोड (वय २२, रा. वाघोली), तसेच चंद्रकांत पोपट शिवले (वय २४, रा. तुळापूर, पो. फुलगाव, ता. हवेली) यांना १ वर्षासाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
सच्चिदानंद ऊर्फ सोन्या शंकर कुसळ (वय २५, रा. चंदननगर) याला १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. सागर सहदेव म्हस्के (वय ३१, रा. विठ्ठलनगर, वडगाव शेरी) याला शहर व जिल्ह्यातून १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. येरवडा परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार वृषभ बाबा पिसे (वय २५, रा. कामराजनगर, येरवडा) याला पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांकरिता तडीपार करण्यात आले.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार रवींद्र दादू रणसिंग (वय २३, रा. विमाननगर) आणि अरबाज अयूब पटेल (वय २३, रा. वडगाव शेरी) या दोघा सराईत गुंडांना एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. एका पोलीस परिमंडळातील ८ गुंडांना एकाच दिवशी तडीपार करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे.