दाम्पत्याने जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी काढलेली आठ लाखांची रोकड लंपास
By नम्रता फडणीस | Published: March 12, 2024 03:50 PM2024-03-12T15:50:52+5:302024-03-12T15:51:03+5:30
पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरु
पुणे : जमीन खरेदीच्या व्यवहारासाठी बँकेतून काढलेली दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना खराडी परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत सुरेश नामदेव खंकाळ (वय ४५, रा. जयसिंग हाऊसजवळ, देहूरोड) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खंकाळ पुणे स्टेशन परिसरातील एका रुग्णालयात कामाला आहेत. खंकाळ दाम्पत्य जमीन खरेदी करणार होते. व्यवहारासाठी त्यांनी बँकेतून आठ लाख १६ हजार रुपये काढले. पैसे पिशवीत ठेवून खंकाळ दाम्पत्य सोमवारी दुपारी दुचाकीवरुन नगर रस्त्यावरील खराडी बायपास चौकातून केशवननगरकडे निघाले होते. चोरटे त्यांच्या मागावर होते. आर. के. बिअर शाॅपीसमोर दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी खंकाळ यांच्याकडील रोकड ठेवलेली पिशवी चोरून नेली. चोरटे मुंढव्याकडे पसार झाले. पिशवीत आठ लाख १६ हजारांची रोकड, आधारकार्ड, धनादेश पुस्तिका असा मुद्देमाल होता. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त
विजयकुमार मगर, सहायक आयुक्त संजय पाटील, पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, उपनिरीक्षक तानाजी शेगर तपास करत आहेत.