अपघातात जखमीला ८ लाखांची नुकसान भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 05:40 PM2018-07-14T17:40:51+5:302018-07-14T17:41:56+5:30
२९ मार्च २०१७ रोजी कांबळे फर्ग्युसन रस्त्याने जात होते. नो एंट्रीतून गेल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले. दंडाची रक्कम भरत असतानाच त्यांना एका चारचाकी वाहनाने मागून धडक दिली होती.
पुणे : वैद्यकीय विमा मिळाल्यानंतरही अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला सर्वसामान्य नुकसान भरपाई देखील मिळू शकते. शनिवारी झालेल्या महालोक अदालतीमध्ये असे एक प्रकरण निकाली काढण्यात आले आहे. जखमीला ७ लाखांचा वैद्यकीय विमा मंजूर झाल्यानंतरही त्याला ८ लाख रुपये सर्वसामान्य नुकसान भरपाई मिळाली आहे.
अपघातात जखमी झालेल्या प्रविण नारायण कांबळे (वय ३९) यांनी याप्रकरणी अॅड. जी. पी. शिंदे यांच्यामार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स विरुद्ध दावा दाखल केला होता. लोक न्यायालयात हे प्रकरण निकाली काढत पॅनलला ८ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिले. २९ मार्च २०१७ रोजी कांबळे फर्ग्युसन रस्त्याने जात होते. नो एंट्रीतून गेल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांना अडवले. दंडाची रक्कम भरत असतानाच त्यांना एका चारचाकी वाहनाने मागून धडक दिली. त्यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या सर्व उपचारांसाठी एकूण ७ लाख रुपये खर्च आला. ही रक्कम वैद्यकीय विम्यातून मंजूर करण्यात आली होती.
कांबळे हे किचनची ट्रॉली बनविण्याचे काम करत अपघातामुळे ते सहा महिने झोपून होते. कांबळे यांच्या शेजारी राहत असलेल्या एका वकिलांने त्यांना सर्वसामान्य नुकसान भरपाईबाबत मार्गदर्शन केले. वैद्यकीय विमा मिळाल्यानंतरही जखमी व्यक्तीला सर्वसामान्य नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद असल्याचे वकिलांना त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार त्यांनी अॅड. शिंदे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. अपघात झाल्याने कामावर न जाता आल्याने झालेले नुकसान, कायमस्वरूपी अपंगत्व, देखभाल करण्यासाठी सतत बरोबर एक व्यक्ती थांबावी लागली (केअरटेकर) आणि रुग्णालयात ये-जा करण्यासाठी आलेला खर्च आदी बाबींचा समावेश करत बांबळे यांनी ८ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली.
अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय विम्यातून खर्च झालेली रक्कम मिळाले. मात्र, त्याचबरोबर त्यांच्या झालेल्या इतर नुकसानीची देखील भरपाई मिळू शकते. अनेकांना याबाबत माहितीच नाही, असे अॅड. जी. पी. शिंदे यांनी सांगितले.