Pune Crime | मोबाइल कंपनीची डीलरशिप देण्याचे आमिष दाखवून ८ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 07:15 PM2023-04-21T19:15:31+5:302023-04-21T19:16:11+5:30
याप्रकरणी कोथरूड सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे...
पुणे : मोबाइल कंपनीची डीलरशिप मिळवून देतो, असे सांगत ८ लाख ३८ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोथरूड परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी उत्तम चेनाराम सुथार (२८, रा. ३०४, रिचमंड टेरेस, भुसारी कॉलनी, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुथार हे सोशल मीडियावर एका मोबाइल कंपनीची डीलरशिप शोधत हाेते. त्यावेळी त्यांना एका वेबसाईटची माहिती मिळाली. त्यावर क्लिक करून नाव, मोबाइल नंबर आणि ई-मेल टाकला असता २-३ दिवसांनी संबंधित मोबाइल कंपनीच्या डीलरशिपसाठी तुम्ही मेल केला होता का? असा त्यांना फोन आला. मी तुम्हाला मोबाइल कंपनीची डीलरशिप मिळवून देतो, तुमचा अर्ज मी पुढे पाठवला असून, अर्ज स्वीकारण्यात आल्याचे त्यांना फोनद्वारे सांगण्यात आले. त्यानंतर २-३ दिवसांनी पुन्हा तुमची मोबाइल कंपनीची डीलरशिप कन्फर्म झाली असून, त्यासाठी मला पेमेंट करावे लागेल, असे सांगत तरुणाकडून १५ हजार २०० रुपयांची मागणी करण्यात आली.
त्यानंतर तरुणाच्या व्हॉट्सॲपवर संबंधित कंपनीच्या मोबाइलच्या किमतीची यादी आणि त्यावरील नफा अशी यादी पाठवत, त्यासाठी अजून पैसे मागितले. तसेच प्रोसेसिंग फीस, दळणवळण खर्च, दुकानाचा फर्निचर खर्च व मोबाइलचे प्रोडक्ट असे सांगत वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. मात्र पैसे भरूनही माल न आल्याने, सुथार यांनी फोन करून विचारले असता कंटेनर ओवरलोडिंगमुळे आरटीओने पकडला आहे, म्हणून आणखीन ३५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
सुथार यांनी २० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या काळात संबंधित फोनवरील इसमाला ८ लाख ३८ हजार २०० रुपये दिले. मात्र नंतर कोणताही प्रतिसाद येत नसल्याने, आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर उत्तम सुथार यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात धाव घेत संजय श्रीवास्तव असे नाव सांगणाऱ्या इसमाविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील हे करत आहेत. याप्रकरणी कोथरूड सायबर पोलिस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला आहे.