८ महिन्यांच्या बाळाने गिळले आईच्या पायातील जोडवे; डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 08:32 PM2022-08-17T20:32:20+5:302022-08-17T20:35:01+5:30

सध्या बाळाची प्रकृती स्थिर...

8-month-old baby swallows mother's anklets; Prompt treatment by doctors can save lives | ८ महिन्यांच्या बाळाने गिळले आईच्या पायातील जोडवे; डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने जीवदान

८ महिन्यांच्या बाळाने गिळले आईच्या पायातील जोडवे; डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने जीवदान

Next

बारामती (पुणे): लहान मुलांच्या खेळकरपणामुळे घरातील वातावरण कायम प्रसन्न राहते. खेळकर मुलांना संभाळताना मात्र आई-वडिलांची दमछाक होते. आज कुरकुंभ येथील एका बाळाने खेळताना चक्क आईच्या पायातील जोडवे गिळल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र, बारामतीच्या डॉक्टरांनी योग्य तपासणीद्वारे तत्पर उपचार केले. त्यानंतर घशातील जोडवे बाहेर काढण्यात यश आले आहे. उपचारानंतर बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावले.

कुरकुंभ (ता.दौंड)येथील एका कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाने खेळत असताना आईच्या पायातील जोडवे गिळले. मात्र, हा प्रकार कुटुंबातील कोणाच्याही लक्षात आला नाही. बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, बाळाचे दूध पिणेही अचानकच बंद झाल्यानंतर पालकांनी येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांचे श्रीपाल हॉस्पिटल गाठले. डॉ.मुथा यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहत विविध तपासण्या केल्या. या बाळाचा एक्स रे काढण्यात आला. यावेळी एक्सरेत बाळाच्या घशात हे जोडवे दिसून आले.

डॉ. मुथा यांनी बाळाला तातडीने निंबाळकर हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवले. डॉ. बी. बी. निंबाळकर, डॉ. सौरभ निंबाळकर यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे या बाळाच्या घशात अडकलेले जोडवे बाहेर काढायचा निर्णय घेतला. डॉ. शशांक शहा यांनी त्या बाळाला भूल दिली. त्यानंतर काही क्षणातच डॉ. निंबाळकर यांनी घशात अडकलेले जोडवे अलगद बाहेर काढण्यात यश आले. या बाळाची प्रकृती आता स्थिर आहे.

Web Title: 8-month-old baby swallows mother's anklets; Prompt treatment by doctors can save lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.