पुणे स्टेशनवरुन अपहरण झालेल्या ८ महिन्याच्या मुलीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 10:58 PM2018-02-12T22:58:51+5:302018-02-12T22:59:32+5:30
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटुंबातील ८ महिन्यांची मुलगी गौरी हिचा शोध लावण्यात सात दिवसांनी रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून महिलेला अटक करण्यात आली आहे.
पुणे - सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या एका कुटुंबातील ८ महिन्यांची मुलगी गौरी हिचा शोध लावण्यात सात दिवसांनी रेल्वे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून महिलेला अटक करण्यात आली आहे.
अनुष्का रवींद्र रणपिसे (२९, रा़ वाल्हेकरवाडी, चिंचवड, मुळगाव रत्नागिरी ) असे या महिलेचे नाव आहे़ ही घटना पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्ग्याजवळ सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते १० वाजण्याच्यादरम्यान घडली. मुल होत नसल्याने तिने मित्राच्या मदतीने हे बाळ पळविले होते, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी लक्ष्मी गेनसिद्ध चाबुकस्वार (वय २८, रा़ अक्कलकोट) यांनी रेल्वे पोलिसांकडे फिर्याद दिली होती़ ती, तिचा पती व ८ महिन्यांची मुलगी गौरी असे तिघे ३ फेब्रुवारीला पुण्यात आले होते. दुसºया दिवशी त्यांनी हडपसर येथे एका ठिकाणी वाढपी म्हणून काम केले. राहायला जागा नसल्याने ते रेल्वे स्टेशनजवळील दर्ग्याजवळ थांबले होते. ५ फेब्रुवारीला त्यांना काही काम मिळाले नाही़ त्यामुळे पुन्हा गावी जावे, असा त्यांचा विचार होता़ त्या रात्री ते दर्ग्याजवळ थांबले असताना एक महिला तेथे आली, तिने त्यांची चौकशी केली़ मुलीसाठी कपडे दिले़ नंतर तिने आपल्या भाच्याला बोलावून घेतले.
तुम्ही जेवण करून या मी मुलीला सांभाळते, असे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून ते भाच्याबरोबर जेवायला गेले. मधूनच तो भाचा निघून गेला़ ते जेवण करून परत आले तर ती बाई व मुलगी तेथे नव्हते. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, पण ती कोठेच न सापडल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली़ पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली़ तेव्हा स्टेशनसमोरील भुयारी मार्गातून ती मुलीला घेऊन जात असताना आढळून आली़ ही महिला अंदाजे ३० ते ३५ वर्षांची असून तिने निळ्या रंगाची साडी व ब्लाऊज घातला होता़ ती मराठीमधून बोलत होती़
या मुलीच्या शोधासाठी रेल्वे पोलीस तसेच पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी पथक एकत्रितपणे तपास करीत होते़ ही महिला वाल्हेकरवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने तेथे जाऊन सोमवारी सांयकाळी तिला पकडले व मुलीची सुटका केली़ अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत़