Summer Special Trains: पुणे ते दानापूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष रेल्वे
By नितीश गोवंडे | Published: April 28, 2023 02:38 PM2023-04-28T14:38:36+5:302023-04-28T14:38:45+5:30
देशातील विविध ठिकाणी जाण्यासाठी उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत
पुणे : मध्य रेल्वेतर्फे उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची गावी अथवा फिरायला जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता, देशातील विविध ठिकाणी जाण्यासाठी उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्यात येत आहेत. पुणे रेल्वे विभागाने देखील पुणे स्थानकावरून दानापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, या मार्गावर उन्हाळी विशेष अनारक्षित रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे ते दानापूर दरम्यान ८ अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वे ३० एप्रिल ते २३ मे दरम्यान सोडण्यात येणार आहे. रेल्वे नं. ०११२१ साप्ताहिक अनारक्षित विशेष रेल्वे दर रविवारी पुण्यातून दुपारी ४ वाजून १६ मिनिटांनी सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. तर रेल्वे नं. ०११२२ साप्ताहिक अनारक्षित विशेष रेल्वे दर मंगळवारी रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी दानापूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून ५ मिनटांनी पोहोचेल. ही रेल्वे दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन आणि बक्सर या ठिकाणी थांबेल. वरील सर्व गाड्या अनारक्षित म्हणून चालतील आणि सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह युटीएस प्रणालीद्वारे या रेल्वेचे तिकीट बुक करता येईल, अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.