रातोरात कापली विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे; वृक्षप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:04 PM2017-10-30T12:04:17+5:302017-10-30T12:11:11+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे शनिवारी रातोरात कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर वृक्षप्रेमींकडून जोरदार टिका करण्यात येत आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील ८ झाडे शनिवारी रातोरात कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वृक्षतोडीवर आक्षेप नोंदविण्यात आले असताना त्यावर सुनावणी न घेताच झाडे कापण्याच्या प्रकारावर वृक्षप्रेमींकडून जोरदार टिका करण्यात येत आहे. याविरोधात त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे.
पुणे विद्यापीठ चौक ते औंध मार्गावरील रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी ४३ झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने अडीच वर्षांपूर्वी दिला होता. या ४३ झाडांमध्ये वडाच्या झाडांसह अनेक मोठे वृक्ष असल्याने त्याला तीव्र आक्षेप घेण्यात आला. खासदार अनिल शिरोळे यांनीही वृक्षतोड न करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र तरीही रात्रीच्या वेळी कारवाई करून झाडे तोडण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते विनोद जैन यांनी सांगितले, ‘‘पहाटे तीनच्या सुमारास प्रशासनाकडून झाडे तोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. कायद्यात झाडे रात्री न तोडण्याची तरतूद असताना झाडे तोडली जात आहेत. आम्ही या वृक्षतोडीवर आक्षेप नोंदविला असताना त्यावर सुनावणी न घेताच बेकायदेशीरपणे वृक्षतोड सुरू करण्यात आली आहे.’’
पहिल्यांदा वृक्षतोडीचा प्रस्ताव दिला तेव्हा या रस्त्यावर बीआरटी केली जाणार असल्याचे कारण सांगण्यात आले होते. मात्र बीआरटी राबविण्यात आलेली नाही.
झाडे तोडून रस्ता रुंद न करता मोठे फुटपाथ बांधून रस्ता पुन्हा अरुंदच केला जात आहे. मग मोठी झाडे तोडण्याचा अट्टहास का, अशी विचारणा स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. महापालिकेने याप्रकरणी तातडीने खुलासा करून संबंधित अधिकार्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पोलिसांकडून मिळत नाही मदत
महापालिकेकडून रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे वृक्षतोड सुरू करण्यात आली. ती थांबविण्यासाठी पोलिसांकडे मदत मागितली, मात्र त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. वृक्षतोड करणार्यांकडे कुर्हाडी व इतर धारदार शस्त्रे असतात, त्यांना वृक्षतोड करण्यास विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास वृक्षप्रेमींच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांची मदत मिळणे आवश्यक असल्याचे विनोद जैन यांनी सांगितले.