कोविड हॉस्पिटलमधील मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलेला अटक; ८ घटना उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 04:20 PM2021-05-29T16:20:53+5:302021-05-29T16:24:48+5:30
चतु:श्रृंगी पोलिसांची कारवाई, महिला ताब्यात, तिच्या मित्राला अटक
पुणे : बाणेर येथील डेडीकेट कोविड हॉस्पिटलमधील मृत्यु पावलेल्या रुग्णांच्या अंगावरील दागिने चोरुन नेण्याचे ८ प्रकार उघडकीस आले आहेत. चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एका महिलेला ताब्यात घेतले आहे. तर, तिला मदत करणाऱ्या तिच्या मित्राला अटक केली आहे.
शारदा अनिल अंबिलढगे (वय ३६, रा. रहाटणी फाटा, थेरगाव) आणि अनिल तुकाराम संगमे (वय ३५, रा. रहाटणी गाव) अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे.
बाणेर येथे डेडीकेड कोविड हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये शारदा अंबिलढगे या कामाला आहेत. रुग्णांची देखभाल व तेथील साफसफाईचे काम त्या करतात. त्या प्रामुख्याने रात्रपाळीला कामावर होत्या. हे काम करीत असताना मृत्यु पावलेल्या रुग्णाच्या अंगावरील दागिने त्या चोरत असत. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडे तक्रारी केल्या. एका मागोमाग एक तक्रारी येऊ लागल्याने डॉक्टरांनी सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यात ही महिला रुग्णांच्या अंगावरील दागिने काढून घेत असल्याचे दिसून आले. हॉस्पिटलकडे ८ तक्रारी आल्या असून त्यात कोणाची अंगठी, गळ्यातील चैन, मोबाईल असा सुमारे १ लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली़ त्यात तिने आपण हे दागिने अनिल संगमे याच्याकडे दिल्याचे व त्याच्यामार्फत विकल्याचे सांगितले. अनिल संगमे व शारदा अंबिलढगे यांनी संगनमत करुन या चोर्या केल्या असून त्यातील दागिने विकण्यासाठी अनिल याने मदत केली असल्याचे चतु:श्रृंगी पोलिसांनी सांगतले.