८ वर्षाच्या तोशिकाने सर केले ७ किल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:13 AM2021-03-09T04:13:19+5:302021-03-09T04:13:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तोशिका तुषार पाटील या अवघ्या ८ वर्षाच्या मुलीने अवघ्या साडेपंधरा तासात तब्बल ७ किल्ले ...

8 year old Toshika conquered 7 forts | ८ वर्षाच्या तोशिकाने सर केले ७ किल्ले

८ वर्षाच्या तोशिकाने सर केले ७ किल्ले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तोशिका तुषार पाटील या अवघ्या ८ वर्षाच्या मुलीने अवघ्या साडेपंधरा तासात तब्बल ७ किल्ले सर करण्याचा पराक्रम केला. तोशिकाने एक मार्चच्या पहाटे साडेपाच ते रात्री नऊ यादरम्यान ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. तिकोणा, तुंग, कोरीगड, लोहगड, विसापूर, मनोरंजन आणि श्रीवर्धन हे सात किल्ले तोशिकाने सर केले.

नाशिक जिल्ह्यातील कळवाडी (ता. मालेगाव) येथील तोशिकाचे आई-वडील नोकरी करतात. नातेवाईकांसोबत गड-किल्ल्यांवर जाण्याच्या छंदातून तिला गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. यंदा ३१ जानेवारीला तोशिका आणि तिची तीन वर्षीय लहान बहीण फाल्गुनी यांनी महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे कळसूबाई शिखर सर केले होते. तोशिकाचा उत्साह पाहून तिचे नातेवाईक रोहन मोरे यांनी एका दिवसात ५ किल्ले सर करण्याची कल्पना मांडली. तोशिका तयार होतीच, तिच्या आई-वडिलांनीही याला संमती दिली.

ठरल्याप्रमाणे एक मार्चच्या पहाटे साडेपाच वाजता पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तिकोणा किल्ल्यापासून मोहिमेला प्रारंभ झाला. सुमारे १ तास २५ मिनिटांत हा किल्ला तिने सर केला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तुंग (१ तास २५ मिनिटे), कोरीगड (५० मिनिटे), लोहगड (१ तास) आणि विसापूर (१ तास ५ मिनिटे) हे ५ किल्ले सर झाले तेव्हा साधारण साडेसहा वाजले होते. राजमाची परिसरातील मनोरंजन आणि श्रीवर्धन या किल्ल्यांवर चढाई रात्री पावणेआठ ते नऊ या सव्वा तासात तोशिकाने केली.

तोशिकाच्या या पराक्रमाची दखल घेत पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले. ‘बकेटलिस्ट ऍडव्हेंचर’चे संचालक ऋतुराज अगवणे, राष्ट्रपती पुरस्कारविजेते सागरी जलतरणपटू रोहन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तोशिकाने किल्ले सर केले.

चौकट

“मला ट्रेकिंग आवडते. आता मला एव्हरेस्ट शिखर सर करायचे आहे. त्या शिखरावरील बर्फ मला खूप आवडते. त्याच्यावर चढताना मजा येईल.”

- तोशिका पाटील

Web Title: 8 year old Toshika conquered 7 forts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.